Valentine day 2023 : दिल्ली गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांची लव्हस्टोरी
Valentine Day Special: रुक्ष, कर्तव्यकठोर, वातट तोंडवळ असलेला केजरीवाल नावाचा माणूस प्रेमाच्या वेलीला बिलगेल असं वाटतंही नाही…पण हो, ते खरंय..! अरविंद केजरीवाल आणि सुनिता यांची प्रेमवेल जन्माला आली.
Valentine Day Special: आज व्हॅलेंटाईन डे... अर्थात प्रेमाचा दिवस... प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2022) खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आज 14 जानेवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा आम्ही खास व्हॅलेंटाईन दिनानिमित्त वाचकांच्या पसंतीस पडलेले काही लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत.
टिपीकल द्वितीय श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यासारखी कपडे, गळ्याला मफलर, डोळ्यांना चष्मा, पायात नोकरदाराची असते तशी चप्पल आणि हातात कसलीशी सुटकेस घेऊन फिरणारे अरविंद केजरीवाल देशाने पाहिले होतेच. अण्णांच्या आंदोलनानं देश चेतला होता तेव्हा केजरीवालच त्या आंदोलनाच्या यज्ञाला फुंकर घालत आहेत हे सर्वश्रृत होतंच. राळेगणसिद्धी आणि महाराष्ट्रात परिचित असलेल्या अण्णांची ओळख देशाला ज्या आंदोलनानं दिली त्या आंदोलनानेच केजरीवालांच्या संघटन, आयोजन-नियोजनक्षमतेचं दर्शन देशाला घडवलं. मोदीलाट असतानाही दिल्लीने देशातील वाऱ्याची दिशा बदलली. देशातला झंझावात दिल्लीने रोखून धरला. देशभरात हवा केलेल्या भाजपचा दिल्लीत धूर निघाला…नाव होतं केजरीवाल (Arvind Kejriwal)
सोप्पं नव्हतं…सत्ताधीशांशी दोन हात करत देश जिथून हाकला जातो त्या राज्याच्या पटावर आपलं नाव कोरणं येड्या-गबाळ्याचं काम नव्हतं. पण केजरीवाल मागे हटले नाहीत…सामाजिक चळवळींचा चेहरा होताच…डोळ्यांत सच्चेपणा…बोलण्यात स्पष्टपणा…चालण्या-बोलण्यात संयम आणि आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला…गल्लोनगल्ली पिंजून काढली…हातात झाडू काय…डोक्यावर टोपी काय…..पुढे काय आणि कसं झालं ते सर्वांनी पाहिलं आहेच… सामाजिक-राजकीय वाऱ्याची घुसळण झाली आणि केजरीवाल नावाचा माणूस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना जगाने पाहिला. केजरीवालांचा शपथविधी सुरू असताना तोबा गर्दीतून टाळ्यांचा आवाज घुमत होता तेव्हा एका खुर्चीवर बसून सुनीताचेही हात अलगद जोडले जात होते. डोळ्यांत आनंदाची, अभिमानाची चमक दिसत होती. शपथविधी संपन्न झाल्यावर केजरीवालांची पावलं सुनिताकडे आपसूक ओढली गेली.
कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघालेल्या केजरीवालांनी डोळे मिटून सुनिताला अलिंगन दिलं आणि फक्त एवढंच म्हणाले… 'थँक्स' पुढे कधीतरी एका मुलाखतीत केजरीवालांनी सुनिताची ओळख करून दिली. "सुनिता नसती तर माझा हा प्रवास घडला नसता. माझ्या आयुष्यातील यशाच्या व्यासपीठावर ती कधी आली नाही, पण सोबत मात्र कायम होती. तिनं माझ्या हातात तिचा हात दिला तो क्षण माझ्या पुढच्या प्रवासाची नांदी ठरला…त्या क्षणाच्या सुगंधाने माझं आयुष्य दरवळून टाकलं…तो दरवळ भविष्यभर पुरेल…त्या क्षणापासून ती माझ्यासोबत आहे…अगदी प्रत्येक क्षण…माझ्या यशाचे हारतुरे तिच्या गळ्यात नाही पडले कधी, पण ती ते हारतुरे कायम वागवत राहिली…निस्वार्थीपणाने..!" रुक्ष, कर्तव्यकठोर, वातट तोंडवळ असलेला केजरीवाल नावाचा माणूस प्रेमाच्या वेलीला बिलगेल असं वाटतंही नाही…पण हो, ते खरंय..!
अरविंद केजरीवाल यांची प्रेमकहाणी
अरविंद केजरीवाल आणि सुनिता यांची प्रेमवेल जन्माला आली…बाळसं धरलं आणि ती वाढली महाराष्ट्रातल्या नागपुरात. मूळ हरियाणाच्या हिस्सार भागातले केजरीवाल अभ्यास-कष्ट-जिद्द-सचोटी-नियोजनाच्या बळावर आयआरएस परीक्षेत यशस्वी झाले. प्रशिक्षणासाठी केजरीवाल येऊन थडकले ते नागपुरात…सुनिताही तिथेच ट्रेनिंगला…केजरीवाल आणि सुनिताची ओळख तिथलीच…प्रशिक्षण, अभ्यास, चर्चा करताना मनांची गुंफण आपसूक झाली…विचार जुळतायत असं कुठंतरी वाटू लागलं…दोघांच्या मनाचा हळवा कोपरा पाझरू लागला…आणि ऑरेज सिटी नागपुरातील ट्रेनिंग सेंटरच्या गार्डनमध्ये झाडा-झुडुपांच्या, फुला-पानांच्या, आभाळ-जमीन-वारा-भोवतालाच्या साक्षीनं बोचऱ्या गुलाबी थंडीत प्रपोज सोहळा पार पडला…प्रेमाच्या आणाभाका घेतल्या गेल्या…एकमेकांच्या साथीनं आयुष्य फुलवायचं ठरलं… दोघांच्या घरच्यांनी विरोध केला नाहीच… दोघांचं शुभमंगल झालं…आज एक मुलगी…एक मुलगा असा छोटा सुखी परिवार आनंदाने नांदतोय
देशभरात चर्चेचा विषय ठरलेला दिल्लीतला ‘ऑड इव्हन फॉर्म्युला’ किती फायद्याचा किती तोट्याचा माहित नाही, पण खुद्द केजरीवालांनी वैयक्तिक आयुष्यात साधलेला ‘गॉड गिव्हन फॉर्म्युला’ मात्र त्यांच्या आयुष्याची वाहतूक सुरळीत करून गेला… पुढे दोघांनी आयआरएसमध्ये नोकरी केली…नंतर केजरीवालांनी सामाजिक, राजकीय ओढीनं नोकरीला रामराम ठोकला…सुनिता अजून नोकरी करतायत. नागपुरात अरविंद केजरीवाल नावाच्या वृक्षाला बिलगलेली ही सुनिता नावाची वेल बहरत गेली…वृक्षाला यशाचं सौंदर्य बहाल करत.