Uddhav Thackeray : मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही, उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना भर सभेतून उत्तर
Uddhav Thackeray on CM Post : मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही. माझी सत्ता तुम्ही सगळे आहात. ती कधीच कोणी घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
कोपरगाव : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर जरी नाही केला तरी चालेल, पण बंद खोलीत का असेना मुख्यमंत्रीपदावर चर्चा व्हावी, अशी भूमिका घेतली होती. यावरून सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता उद्धव ठाकरेंनी भर सभेतूनच सत्ताधाऱ्यांना उत्तर दिले आहे. मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घ्यायला गेलो होतो. माझ्या बहिणींना आणि भावांना न्याय द्या, त्यांना ताकद द्या, असं साकदं घातलं. आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. कारण तुमचा हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही. मी विचार करत बसलोय की, तुम्ही मला काय म्हणून बोलावलं? माझा येथे उल्लेख झाला की, माजी मुख्यमंत्री, माझा पक्ष चोरला. चिन्ह चोरलं आणि वडील देखील चोरले आहेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागत आहात.
तुम्हाला मी न्याय देणार
मला दिवार चित्रपटातील डायलॉग आठवला. मिंधे वगेरे मला सांगत आहेत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, तेरे पास क्या है? मग अमिताभ बच्चन म्हणाले होते मेरे पास मा है, तसंच मी सांगतोय मेरे पास ईमान है, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की, माझ्याकडे आज काहीच नाही. तरी देखील तुम्ही मला बोलावत आहात आणि मी सुद्धा आलो आहे. कारण मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार, असा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना दिला.
कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणासुद्धा करतील
फोडाफोडीचे राजकारण सत्ताधारी करणारच आहे. यांना टेन्शन दिले पाहिजे. आधी उपाशी आहात. त्यामुळे उपोषण करू नका. यांना सत्तेशिवाय उपोषणावर पाठवा एवढं काम करा. मिंधे आणि चमचे माझे भाषण बघतात. आपलं सरकार आलं तर तुमची मागणी मी मान्य करतो. मी वचन दिल्यावर यांना घाम फुटेल व कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणासुद्धा करतील, असा टोला त्यांनी यावेळी शिंदे सरकारला लगावला.
मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही
मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही हाडा मासाची माणसं होय. माझी सत्ता तुम्ही सगळे आहात. ती कधीच कोणी घेऊ शकत नाही. तुमच्यामुळे महाराष्ट्र काम करतो. तुम्ही घराघरात जाऊन योजना राबवितात. त्यामुळे तुमची साथ महत्वाची आहे. लाडकी बहीण योजना आणली. मात्र, भाऊ कोणाला म्हणायचं हे बहिणींना कळत नाही. सगळे जण म्हणताय मीच तुझा भाऊ. हे सगळे फुकट खाऊ, अशी टीका उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर केली.
तुम्हाला हवी तशी पेन्शन योजना आम्ही सत्तेत आल्यावर देणार
तुम्ही योजना राबवता आणि हे फुकटसुंभ त्याचं श्रेय घेतात. कोरोना आला नसता तर तुम्हाला असं जमण्याची वेळ आली नसती. काही योजना चांगल्या आहेत. मात्र तिजोरीकडे पाहिलं जात नाही. निर्मला सीतारामन यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, असे लोकसभेत म्हटले. त्यामुळे यांनी जरी घोषणा केली तरी तुम्हाला काही मिळणार नाही. दिल्लीला विचारल्याशिवाय हे काहीच करू शकत नाही. आम्ही स्वतः टोप्या घालतो. मात्र लोकांना टोप्या घालत नाही. ते काम मिंधे करतात. तुम्हाला हवी तशी पेन्शन योजना आम्ही सत्तेत आल्यावर देणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
आणखी वाचा