पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरचे भूषण सतई शहीद
ऋषिकेश हे दोन वर्षांपूर्वी सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू-काश्मीर या ठिकाणी झाली होती. तर भूषण सतई 2010 मध्ये सैन्यात रुजू झाल्यानंतर सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते.
नागपूर/कोल्हापूर : पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील रहिवासी भूषण सतई यांना वीरमरण आले आहे. एकूण पाच भारतीय जवानांना यात वीरमरण आलं होतं.
ऋषिकेश जोंधळे शहीद झाल्याची बातमी गावामध्ये कळताच ऐन दिवाळीत गावावर शोककळा पसरली. ऋषिकेश हे दोन वर्षांपूर्वी सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू-काश्मीर या ठिकाणी झाली होती. एकुलता एक असलेल्या ऋषिकेश यांना अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच वेळी पाकिस्तानला भारत सरकारने सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचा संताप देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ज्या शाळेत ऋषिकेश यांचं शिक्षण झालं त्या शाळेच्या आवारातच ऋषिकेश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तर नागपूरचे भूषण रमेश सतई हे 28 वर्षांचे होते. भूषण सतई सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. 2010 मध्ये निवड झाल्यानंतर 23 ऑक्टोबर 2011 मध्ये रितसर प्रशिक्षण पूर्ण करून भूषण मराठा बटालियनमध्ये रुजू झाले होते. गेल्या एक वर्षांपासून त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये होती. सध्या ते सीमेजवळच्या गुरेज सेक्टर मध्ये कार्यरत होते. काल सीमेवर झालेल्या गोळाबारात भूषण पाकिस्तानी सैन्याला चोख प्रतिउत्तर देत असताना पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांचा माऱ्यात एक तोफगोळा त्यांच्या बंकरवर पडला आणि त्यातच भूषण यांना वीरमरण आले. सध्या त्यांनी बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु केली होती. बहिणीच्या लग्नानंतर भूषण लग्न करणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना वीरमरण आले. भूषण यांचे आई वडील शेतमजूर असून कुटुंबाची परिस्थिती भूषण नोकरीवर लागल्यानंतर हळूहळू सुधारत होती.
शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांची मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय सैन्य सर्व क्षेत्रांमध्ये चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय जवानांनी गोळीबारात 7-8 पाकिस्तानी जवानांना ठार मारले. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकचे सुमारे 10-12 सैनिक जखमी झाले आहेत आणि पाक लष्कराचे मोठ्या प्रमाणात बंकर व लाँच पॅड नष्ट करण्यात आले आहेत.