Onion Price Reduced: टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही स्वस्त; 25 रुपये किलोने होणार विक्री, 'या' दिवसापासून सुरुवात
Onion Price Reduced: केंद्र सरकार आता टोमॅटोनंतर कांद्याचे दरही कमी करणार आहे. शेतकऱ्याला नुकताच कांद्याचा थोडा फायदा होऊ लागला होता, अशातच सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडणार आहे.
![Onion Price Reduced: टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही स्वस्त; 25 रुपये किलोने होणार विक्री, 'या' दिवसापासून सुरुवात Onion Price Reduced government takes another measures after imposing export duty to ensure onions at affordable rate Onion Price Reduced: टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही स्वस्त; 25 रुपये किलोने होणार विक्री, 'या' दिवसापासून सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/ff5b4e81dcf9416a051535e1739110561685000511956359_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Onion Price Reduced: सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू केल्यानंतर केंद्र सरकारने कांद्याबाबतही तसाच निर्णय घेतला आहे. आता सरकार कांदाही स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहे. सध्या कांद्याचे (Onion) दर 40 रुपये प्रतिकिलो आहेत, पण आता कांदा 25 रुपये किलो दराने मिळणार आहे. सोमवारपासून (21 ऑगस्ट) सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू होणार आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचं हे आणखी एक मोठं पाऊल आहे.
सरकार अनुदानित कांदा 25 रुपये किलो दराने विकणार
सोमवारपासून (21 ऑगस्ट) 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली जाईल, असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. स्वस्त दरात कांद्याची (O) ही विक्री नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) या सहकारी संस्थेद्वारे केली जाईल. एनसीसीएफ सोमवारपासून स्वस्त दरात कांद्याची विक्री करणार आहे.
कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क
यापूर्वी शनिवारी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्क वाढवण्याची माहिती दिली होती. केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील हा निर्णय 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील. कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्कात आकारल्याने कांदा उत्पादक शेतकरी मात्र आक्रमक झाले आहेत, त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
यासाठी सरकारने उचलली पावलं
कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारचं हे पाऊल कांद्याचे भाव वाढण्याची भीती दूर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात पाहिलं जात आहे. टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ करू शकतो आणि सप्टेंबरपासून त्याच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळेच येत्या काही महिन्यांत सणासुदीच्या काळात महागाईचा लोकांना फारसा त्रास होऊ नये म्हणून सरकारने दरांत घसरण करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याची मर्यादा वाढवली
कांद्याच्या किमती नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने त्याच्या बफर स्टॉकची मर्यादाही वाढवली आहे. यापूर्वी कांद्याची बफर मर्यादा 3 लाख मेट्रिक टन निश्चित करण्यात आली होती. निर्धारित उद्दिष्टानुसार खरेदी झाल्यानंतर आता सरकारने ती वाढवून 5 लाख टन केली आहे. सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही सहकारी संस्थांना प्रत्येकी 1 लाख टन अतिरिक्त खरेदी करण्यास सांगितलं आहे.
बफर स्टॉकमधून पुरवठा सुरू
सरकारने बफर स्टॉकमधून कांदा बाजारात पाठवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत राखीव भागातून सुमारे 1,400 टन कांदा बाजारात आला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि पुरेशी उपलब्धता राखली जावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव टोमॅटोप्रमाणे गगनाला भिडणार नाहीत, यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे.
टोमॅटोने वाढवली होती चिंता
याआधी टोमॅटोच्या दराने लोकांना हैराण केलं होतं. देशातील विविध शहरांमध्ये टोमॅटोचे दर 200 ते 250 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचले होते. त्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेडने स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू केली. काही दिवसांपूर्वी टोमॅटो 90 रुपये किलोने विकला जात होता, आता त्याचे दर किलोमागे 40 रुपये झाले आहेत. टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेला होता.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)