(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
Man Bites Snake : साप चावला म्हणून त्या व्यक्तीने सापाचाच चावा घेतला, या घटनेनंतर सापाचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.
Trending News : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, यामुळे जंगलाच्या जवळच्या परिसरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप आल्याचं पाहायला मिळतं. या काळात सर्पदंशाच्या अनेक घटनाही ऐकायला मिळतात. सध्या सर्पदंशाची एक घटना चर्चेत आहे, पण अशी घटना तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसेल. साप चावला म्हणून रागाच्या भरात तरुणाने सापाचाच चावा घेतल्याची विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाला साप चावला, यानंतर त्याने रागाच्या भरात सापाला एक किंवा दोन नाही, तर तीन वेळा चावा घेतला. यानंतर सापाची मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
साप चावला म्हणून पठ्ठ्या सापालाच चावला
बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला साप चावला. यानंतर हा व्यक्ती तीन वेळा सापाला चावला, त्यामुळे सापाचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या तरुणाने सांगितलं की, माझ्या गावात सर्पदंशावर गावकरी हीच युक्ती करतात, त्यानेही तेच केलं.
नेमकं काय घडलं?
बिहारमधील नवादा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगली भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा सर्व कामगार त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपलं होते. यावेळी संतोष लोहार नावाच्या मजुराला विषारी साप चावला. यानंतर संतप्त झालेल्या संतोषने लोखंडी रॉडच्या साहाय्याने सापाला पकडलं आणि सापाला तीन वेळा चावा घेतला, यामुळे साप मरण पावला.
उपचारांसाठी तरुण रुग्णालयात भरती
ही घटना रेल्वे अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या तरुणाला तातडीने उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. हा तरुण झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. सर्पदंशावर उपचार घेत असताना संतोषने रंजक कहाणी सांगितली.
सर्पदंशावर गावठी उपाय करणं कितपत योग्य?
साप चावल्यामुळे संतप्त झालेल्या संतोष लोहार या तरुणाने सांगितलं की, त्याने सर्पदंशावर गावठी उपाय केला. त्याच्या गावात सर्पदंशासाठी हाच उपाय केला जात असल्याचं त्याने सांगितलं. संतोषने सांगितलं की, त्यांच्या गावात साप चावल्यावर ही युक्ती वापरली जाते. जर तुम्हाला एकदा साप चावला तर तुम्ही सापाला दोनदा चावा, यामुळे सापाच्या विषाचा तुमच्यावर कधीही परिणाम होणार नाही, असा दावा त्याने केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :