काय म्हणता? 24 वर्षाच्या तरुणीचं स्वत:शीच लग्न; लग्नानंतर हनिमूनलाही जाणार, कारण काय तर...
Gujarat Vadodara News : मंडप असेल, नववधूच्या रुपात नवरीही असेल. मात्र नवरदेव मात्र कुणी नसणार आहे. कारण एक तरुणी स्वत:शीच लग्न करणार आहे.
Gujrat News : बातमीचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल असं कसं काय? पण हे खरं आहे. मंडप असेल, नववधूच्या रुपात नवरीही असेल. मात्र नवरदेव मात्र कुणी नसणार आहे. कारण एक तरुणी स्वत:शीच लग्न करणार आहे. गुजरातमधील 24 वर्षांची क्षमा बिंदु 11 जून रोजी स्वत:सोबत लग्न करणार आहे. क्षमानं आपल्या लग्नासाठी लहंगा, सोने खरेदी केलं आहे, पार्लर देखील बुक केलं आहे आणि आता ती नवरी होण्यासाठी सज्ज आहे. मात्र इथं कुठलाही नवरदेव असणार नाही. गुजरातमध्ये पहिल्यांदाच असा आत्मविवाह होत आहे. क्षमाच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे.
नवरी बनायचं होतं पण लग्न करायचं नव्हतं
या निर्णयाबाबत बोलताना क्षमानं सांगितलं की, मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मात्र मला नवरी बनायचं होतं. त्यामुळं मी स्वत:शीच लग्न करायचा निर्णय घेतला. तिनं यासाठी परदेशात कुठं असं लग्न कुणी केलंय का? याचा शोध देखील घेतला. मात्र तिला तसं कुणी आढळून आलं नाही. तिनं म्हटलं की, कदाचित मी आपल्या देशातील पहिली व्यक्ती आहे जिनं आत्म प्रेमाचं एक वेगळं उदाहरण दिलं आहे.
स्वत:वर प्रेम करते आणि म्हणूनच मी स्वत:सोबत लग्न
क्षमा एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तिनं म्हटलं की, स्व-विवाह विनाशर्त स्वत:वर प्रेम करण्याचं एक मानक असेल. हे आत्म-स्वीकृतीचं एक काम आहे. लोकं अशा व्यक्तिसोबत लग्न करतात जिच्यावर ते प्रेम करतात. मी स्वत:वर प्रेम करते आणि म्हणूनच मी स्वत:सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आईवडील देखील झाले लग्नासाठी तयार
क्षमानं म्हटलं की, माझ्या या निर्णयाला काही लोकं अतार्किक मानतील. मात्र माझ्या आईवडिलांनी माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी मला या लग्नासाठी आशीर्वाद देखील दिले आहेत.
मंदिरात करणार लग्न
क्षमानं आपल्या लग्नासाठी गोत्रीमधील एक मंदिर निवडलं आहे. या मंदिरात ती स्वत:सोबत लग्न करेल. लग्नात म्हणण्यासाठी तिनं स्वत:साठी पाच शपथा लिहिल्या आहेत. विशेष बाब अशी की, लग्नानंतर क्षमा हनिमूनला देखील जाणार आहे. ती गोव्याला हनिमूनला जाणार आहे, जिथं ती दोन आठवडे राहणार आहे.