Resignation Letter : असं कोण करतं? कंपनीच्या CFO नं मुलाच्या वहीवरच लिहिला राजीनामा, सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिला का?
Viral News : अलिकडच्या काळात सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल होत आहे. एका कंपनीच्या CFO चा लहान मुलाच्या वहीच्या पानावर लिहिले राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Viral Resignation Letter : आपल्या देशात नोकरदार वर्ग फार मोठा आहे. काही जण आवडीची नोकरी करतात, तर काही नाईलाजास्तव. पैशाच्या चणचणीमुळे काही जण नोकरीचं ओझं झेलतं बसतात, तर काही लोक कंटाळून किंवा इतर काही कारणांनी तडकाफडकी राजीनामा देतात. राजीनामा पत्र लिहिणं सुद्धा एक कला आहे. कंपनीतील छोट्या कामगारापासून मॅनेजर ते अगदी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना नोकरी सोडताना राजीनामा पत्र लिहिण्याचा गुण लागू होतो. काही जण राजीनामा पत्रात मनातील खदखद मांडतात तर काही जण फक्त टाटा बाय-बाय करत राजीनामा देतात. गेल्या काही काळात सोशल मीडियावर असे विविध प्रकारचे राजीनामा पत्र व्हायरल झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एक राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंपनीच्या CFO चा तडकाफडकी राजीनामा!
हे व्हायरल राजीनामा पत्र पाहून तुम्हीही विचार कराल की, असं कोण करतं? सध्या एक आगळं वेगळं राजीनामा पत्र सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. एका कंपनीच्या CFO (Chief Financial Officer) चा राजीनामा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा राजीनामा व्हायरल होण्याचं कारण म्हणजे CFO चा हा राजीनामा एका साध्या रफ वहीच्या पानावर पेनाने लिहिलेला आहे. कंपनीच्या CFO चा वहीच्या पानावर लिहिलेला राजीनामा पाहून सर्वजण चकित झाले आहेत.
मुलाच्या वहीवर लिहिलेलं Resignation Letter व्हायरल
एका युजरने संदीप अनिमा (Sandeep Anima) या एक्स (Twitter X) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'मित्शी इंडिया लिमिटेडच्या (Mitshi India Ltd) सीएफओने (CFO) त्यांचे मूल वापरत असलेल्या नोट बुकवर लिहून राजीनामा दिला आहे. ते छापण्याची वाटही पाहिली नाही.'
पाहा व्हायरल राजीनामा पत्र
So, the CFO of Mitshi India Ltd has submitted his resignation by writing on a note book that his child is using.. didn't even wait to get it printed. 🤣#stockmarket#resignation#CFO pic.twitter.com/CKayBVxpYb
— Sandeep Anima (@AnimaSandeep) December 21, 2023
वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा
व्हायरल झालेलं हे राजीनामा पत्र ते रिंकू पटेल नावाच्या व्यक्तीने लिहिल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. मित्शी इंडियाचे CFO म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचा हा राजीनामा असल्याचं फोटोवरून दिसत आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी सीएफओ पदाचा राजीनामा देत असल्याचं या राजीनामा पत्रात लिहिलं आहे. माझी कंपनी किंवा माझ्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. कंपनीत काम करण्याचा अनुभव आनंददायी होता, असं या पत्रात रिंकू पटेलनं लिहिलं आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
@AnimaSandeep नावाच्या अकाऊंटने हा फोटो X वर शेअर केल्यानंतर सुमारे 1200 हून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हा राजीनामा वाचून काही युजर्सला हसू आवरता आलेलं नाही, तर काही जण आता अशाच पद्धतीने राजीनामा द्यायला हवा, असं सांगत आहेत. इतकंच काय तर एका युजरने मिश्किलपणे हा राजीनामा मान्यही केला आहे. अनेक जण कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. मित्शी इंडिया कंपनी पूर्वी डेरा पेंट्स आणि केमिकल्स म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी पेपर, प्लास्टिक, हार्डवेअर आणि मेटल उत्पादने बनवते.