Viral News: नवरदेवाने खरेदी केला स्वस्त लेहंगा... नाराज नवरीने लग्नच मोडलं, पोलिस ठाण्यातच दोन्ही बाजू भिडल्या
Bride Cancels Wedding: अल्मोडामध्ये राहणाऱ्या नवरदेवाने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी लखनऊवरुन 10 हजार रुपयांचा लेहंगा मागवला होता.
मुंबई: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्याचं बोललं जातं. पण मग अशी अनेक कारणं असतात की ठरलेली लग्न मोडतात. आधीची प्रेमप्रकरणं, मानपानावरुन दोन्ही बाजूंचे इगो मधे आल्याने अनेकदा लग्नं मोडतात. पण उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरातील एक लग्न का मोडलं याचं कारण ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. नवरदेवाने स्वस्त किमतीचा लेहंगा (lehenga) दिल्याने नाराज झालेल्या नवरीने चक्क लग्नच मोडलं. हा स्वस्त लेहंगादेखील तब्बल 10 हजार रुपयांचा होता हे विशेष.
अल्मोडामध्ये राहणाऱ्या नवरदेवाने त्याच्या होणाऱ्या नवरीसाठी लखनऊवरुन खरेदी केलेला लेहंगा पार्सल पाठवला होता. हा लेहंगा तब्बल 10 हजार रुपयांचा होता. पण नवरीमुलीला तो लेहंगा स्वस्त पसंत पडला नाही. हा लेहंगा स्वस्त असल्याचं त्या नवरीला वाटलं आणि त्यावरुन ती नाराज झाली. मग नाराज झालेल्या त्या नवरीने चक्क लग्नाला नकार देत चांगलाच गोंधळ घातला.
नवरीने ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याने आणि तेही एका लेहंग्यावरुन, त्यामुळे नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. नंतर हे प्रकरण थेट हल्द्वानी पोलिस ठाण्यात गेलं. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार हंगामा झाला तोही पोलिसांसमोरच. हे प्रकरण मिटवता मिटवता पोलिसांच्या नाकी नऊ आलं. शेवटी पोलिसांनी कसंतरी करुन हे प्रकरण मिटवलं आणि दोन्ही पक्षांना त्यांच्या-त्यांच्या घरी पाठवलं.
नवरदेवाच्या कुटुंबियाने या लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या आणि त्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये वाटल्या होत्या. आता लग्नच मोडल्याने त्याचं काय करायचं आणि नातेवाईकांना काय सांगायचं असा मोठा प्रश्न पडला आहे. केवळ लेहंग्यासाठी लग्न मोडलं हे मुलाकडील कुटुंबियांना पचवण्यास अवघड जात आहे. या प्रकरणाची चर्चा उत्तराखंडमध्ये जोरदार सुरू आहे. यासंबंधित बातम्याही प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे मुलाच्या आणि मुलीच्याही कुटुंबियांना आता मनस्ताप भोगावा लागत असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
मुलीकडील कुटुंबीय हे नैनितालमधील हल्द्वानीमधील राहणारे आहे. तर मुलाकडील कुटुंबीय हे अल्मोडामध्ये राहणारे आहे. मुलगा आणि मुलीने, एकमेकांना पसंत पडल्यानंतर जून महिन्यात साखरपूडा केला होता. त्यानंतर लग्न डिसेंबरमध्ये करायचं असं ठरलं होतं. आता हे लग्न मोडल आहे, आणि त्याला कारणीभूत ठरलाय तो दहा हजार रुपये किमतीचा 'स्वस्त' लेहंगा.
ही बातमी वाचा:
- Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!