ESIC Scam : विमाधारक नसलेल्या रुग्णांवरही उपचार, 22 रुग्णांना रेफर करून सर्जरी
अनेक रुग्णांच्या कार्डवर 'अदर मेजर सर्जरी' हा शेरा दिसत होता. यामुळे बिल मंजूर करणाऱ्या मुंबईच्या ESIC कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शंका आली. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यावर ही माहिती पुढे आली.
नागपूरः सोमवारीपेठ येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात (ESIC) सर्जरीसाठी आलेल्या कामगार रुग्णांना पळवून त्या रुग्णांवर संलग्न हॉस्पिटलमध्ये (प्रायव्हेट) शस्त्रक्रिया करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या सर्जनचे अफलातून कारनामे पुढे आले आहे. या सर्जनने कामगार रुग्णालयातील सर्जरी विभागात चक्क विमाधारक नसलेल्या रुग्णावर उपचार केल्याचे प्रकरण उजेडात आले.
कामगार रुग्णालयात सर्जरीची सोय आहे. मात्र ऑक्टोबर 2020मध्ये रुजू झालेल्या कंत्राटावरील सर्जनने संलग्न असलेल्या हॉस्पिटलमध्ये सर्जरीसाठी रेफर करण्याचा सपाटा लावला. प्राथमिक स्तरावर 22 रुग्णांना पळवून अर्थात रेफर करून त्याच्यावर संलग्न हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आल्या होत्या. अशा रुग्णांची बिले फुगवून दाखवण्यात येत होती. ज्या रुग्णांची सर्जरी झाली त्या कार्डावर अदर मेजर सर्जरी असा शेरा मारून जादा बिल मंजुरीसाठी पाठवण्यात येत होते.
अनेक रुग्णांच्या कार्डवर अदर मेजर सर्जरी हा शेरा दिसत होता. यामुळे बिल मंजूर करणाऱ्या मुंबईच्या ESIC कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शंका आली. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आल्यानंतर या प्रकरणात सर्जनचे हात गुंतले असल्याची माहिती पुढे आली. जास्तीचे बिल ESICच्या माथी मारून मलिदा खाण्याचा प्रकार दोन वर्षांपासून सुरु असल्याचे दिसून आले. बिल मंजूर करण्याचा हा प्रकार कामगार रुग्णालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
या प्रकरणात ESICमधील काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या सर्जनने विमाधारक नसलेल्या एका रुग्णाला कामगार रुग्णालयात तपासत असताना एका परिचारिकेने आक्षेप घेतला होता. मात्र परिचारिकेलाच रागवण्यात आले होते. परिचारिकेने या प्रकरणाची तक्रार प्रशासनाकडे केली होती. मात्र हे प्रकरण दाबण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. त्याचवेळी या घोटाळेबाज सर्जनवर कारवाई केली असती तर हा बिलांचा घोटाळा झाला नसता, अशी जोरदार चर्चा येथे रंगली आहे.
चौकशी समिती गठित
राज्य कामगार रुग्णालयातील बिल घोटाळा प्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोलोमन लिंगाला यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये डॉ. नरेंद्र कोडवते, डॉ. हर्षवर्धन कांबळे, प्रशासकीय अधिकारी विजय घोडे, गणेश चौरसिया यांचा समावेश आहे. येत्या चार दिवसात चौकशी पूर्ण होईल, अशी माहिती असून या प्रकरणी कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक तातडीने मुंबईला रवाना झाल्या असल्याची माहिती आहे.