(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulhasnagar : खिडकीतील ग्रीलसह सातव्या मजल्यावरून कोसळली, पण दुखापतीवर निभावलं; उल्हासनगरमधील घटना
Ulhasnagar News : एवढ्या मोठ्या जीवघेण्या अपघातातून ही महिला बचावली आहे. सध्या तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगर : नशीब बलवत्तर असेल तर अनेक मोठ्या अपघातातून सुखरुपपणे बचावले गेल्याची उदाहरणे आपण पाहतो. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) समोर आली आहे. इमारतीच्या खिडकीतील ग्रीलमध्ये कपडे सुकवण्यासाठी महिला उभी होती. मात्र, तोच ग्रीलसह ही महिला सातव्या मजल्यावरून खाली कोसळली. एवढ्या मोठ्या जीवघेण्या अपघातातून ही महिला बचावली आहे. सध्या तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक 5 या भागात भाटिया रोडवर महालक्ष्मी टॉवर इमारत आहे. दुपारी कपडे सुकायला घालत असताना खिडकीच्या ग्रीलमध्ये ही महिला उभी राहिली. त्यावेळी ग्रीलसोबत ही महिला सातव्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र त्या सुदैवाने ही महिला बचावली.
उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरात महालक्ष्मी टॉवर इमारत आहे. इथे सातव्या मजल्यावर कोमल तेजवानी या कपडे सुकायला टाकत असताना ग्रील सोबत त्या बाजूला असलेल्या पत्र्यावर कोसळल्या. ह्या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेला जखमी अवस्थेत बाहेर काढलं आहे. सध्या कोमल यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहेत. दरम्यान कोमल तेजवानी राहत असलेली इमारत धोकादायक अवस्थेत होती का? की कोमल हिला कोणी ढकलून तर दिलं नाही ना ,असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे? आता याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी तपास करून नेमकी ही घटना घडली कशी याचा खुलासा करावा अशी मागणी नागरीक करत आहेत.