Thane News : साकेत ब्रिजमुळे ठाणेकर पुन्हा वेठीस, पुढचे आठ दिवस ठाणे शहरात वाहतूक कोंडी
Thane Saket Bridge : पुढचे आठ दिवस याच महामार्गावर आणि पर्यायाने ठाणे शहरात देखील वाहतूक कोंडी होणार आहे आणि त्याचे नवीन कारण समोर आले आहेत.
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्ग (Mumbai-Nashik Highway) आणि ठाणे शहरात (Thane City) वाहतूक कोंडी (Traffic Jam) हे नेहमीचं समीकरण आहे. फक्त, त्यासाठी नवनवीन कारणे सांगितली जातात. आता पुढचे आठ दिवस याच महामार्गावर आणि पर्यायाने ठाणे शहरात देखील वाहतूक कोंडी होणार आहे आणि त्याचे नवीन कारण समोर आले आहेत.
साकेत ब्रिजमुळे ठाणेकर पुन्हा वेठीस
ठाण्याच्या माजीवाडा नाक्याजवळ ठाणे खाडीवरील साकेत ब्रिज म्हणजे मुंबई-नाशिक महामार्गाची सुरुवात म्हणावी लागेल. मात्र, याच साकेत ब्रिजच्या एका मार्गिकेवरील मधला भाग बुधवारी सकाळी खूप जास्त हळू लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक मनसे पदाधिकारी रवींद्र मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी एमएसआरडीसी तसेच वाहतूक पोलिसांना घटनास्थळी बोलवून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
वजड वाहतूक बंद, नाशिककडे जाणाऱ्या नागरिकेवर बॅरिकेटिंग
त्यानंतर सध्या धोकादायक झालेल्या भागावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून नाशिककडे जाणाऱ्या नागरिकेवर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच ठाणे शहरात माजिवडा नाका आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मात्र, हा पूल इतका का हलू लागला हे बघण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी पुलाच्या खाली जाऊन सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पुलाच्या खालच्या बाजूचे बेरींग तुटले
ठाणे खाडीवरील साकेतचा ब्रिज म्हणजे दोन वेगवेगळे पूल आहेत, येथील ठाण्याच्या दिशेने येणारी एक मार्गिका 1986 च्या आसपास तर, नाशिककडे जाणारी मार्गिका 1999 च्या आसपास बांधण्यात आली असल्याचे काही अधिकारी सांगतात. सध्या धोकादायक झालेली मार्गिका ही नाशिककडे जाणारी मार्गिका आहे. साकेत उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत होता. हा पूल दीड वर्षापूर्वी एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. तसेच दर 15 ते 20 वर्षांनी पुलाखाली बसविण्यात येणारे बेअरिंग बदलण्यात येत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले. मात्र, शेवटची दुरुस्ती कधी झाली, याबाबत माहिती घेत असल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले.
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक संतप्त
यामधली महत्त्वाची बाब म्हणजे, मे महिन्यात एक विशेष ब्लॉक घेऊन या पुलावर डागडुजीचे काम करण्यात आले. त्यावेळी देखील वाहतूक वळवण्यात आल्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता आणि आता पुन्हा याच साकेत पुलामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत.
एमएसआरडीसी काय म्हणतंय?
पुलाला कोणताही धोका नाही, प्रत्येक पुलाखाली असलेल्या बेअरिंग 15 ते 20 वर्षांनी परिस्थितीनुसार बदलाव्या लागतात. या पुलाच्या चारपैकी एक बेअरिंग नादुरुस्त झाली, असून ती बदलल्यानंतर पुलाला कोणताही धोका राहणार नाही, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
मात्र, मे महिन्यात घेतलेल्या ब्लॉग दरम्यान संपूर्ण पुलाची पाहणी का करण्यात आली नाही, असा देखील प्रश्न निर्माण होतो. तसेच, आता तात्पुरते काम केल्यानंतर हा जुना झालेला पुल धोकादायक होणार नाही, याची शाश्वती काय, असा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.