(Source: Poll of Polls)
Thane News : BMC च्या कॅग चौकशीनंतर आता ठाण्यातील रस्त्यांचे ऑडिट; आयआयटीकडून पाहणी सुरू
Thane News : ठाणे महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचे ऑडिट करण्यात येत आहे.
Thane News : मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कामांची कॅगमार्फत (CAG) चौकशी करण्यात आल्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) रस्त्यांचे ऑडिट करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामाचे आयआयटी मार्फत ऑडिट सुरू करण्यात आले आहे. ठाण्यातील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 605 कोटी टप्प्याटप्प्यात ठाणे महानगरपालिकेला मिळत आहेत. मात्र या पैशातून झालेल्या कामाचे ऑडिट आयआयटीचे तज्ज्ञ करत आहेत.
ठाणे महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एक टीम सध्या ठाण्यात आहे. ही टीम सध्या सर्वत्र फिरून माहिती जमा करत आहे. त्यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. यानंतर एक रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो गृहीत धरून ठेकेदाराला प्रत्येक खंडाच्या मागे एक लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत शहर सुशोभिकरण आणि खड्डे मुक्त रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार दोन टप्यात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे अंतिम टप्यात आल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या टप्याच्या कामांना देखील वेग आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 214 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 391 कोटी असे एकूण 605 कोटी निधी रस्त्यांसाठी मिळणार आहे. त्यातून शहरातील 283 रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या आणि नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही सर्व रस्त्याची कामे 31 मे पूर्वी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन आहे.
ही कामे दर्जेदार व्हावी यासाठी थर्ड पार्टी ऑडिट केले जात आहेत. त्यानुसार मागील काही दिवसापासून शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्त्यांची झाडाझडती आयआयटी कडून केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. आयआयटीचे एक पथक ठाण्यात धडकले असून ठाणे महापालिकेच्या अभियंत्या समवेत आयआयटीचे के. व्ही. कृष्णराव आपल्या पथकासमवेत ठाण्यात दाखल झाले आहेत.
ठाणे महापालिका अर्थसंकल्पात भरीव तरतूद
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या मालकीचे 384 कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 205 कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी. चे आहेत व उर्वरित डांबरी रस्ते आहेत. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण ठाण्यात मजबूत रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यामध्ये शासनाकडून पहिल्या टप्प्यात रु.214 कोटी व दुस-या टप्प्यात रु.391 कोटी असे एकूण रु.605 कोटी अनुदान मंजूर झालेले आहे. या अनुदानातून शहरातील 283 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यामध्ये 10.46 कि.मी. काँक्रीट रस्ते, 59.31 कि.मी. युटीडब्ल्यूटी व 46.77 कि.मी. डांबरी रस्ते व 19.12 कि.मी. चे मास्टीक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात येत असून यामध्ये महापालिका परिक्षेत्रातील प्रभाग समितीमधील रस्त्यांचा समावेश आहे. ही सर्व रस्त्यांची कामे मे 2023 पुर्वी पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
महापालिकेच्या निधीमधून महापालिकेच्या अखत्यारीतील असलेले इतर सर्व प्रकारचे रस्ते सुस्थितीत राखण्याकरीता डांबरीकरण पद्धतीने रिसरफेसिंग, सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. ही सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करुन तद्नंतर महापालिकेच्या रस्त्यावर येत्या पावसाळयामध्ये खड्डे पडणार नाहीत याची दक्षता घेऊन खड्डे मुक्त ठाणे करण्याचा संकल्प आहे. यासाठी अंदाजपत्रकात विविध लेखाशीर्षांतर्गत तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्यत्वे तरतुदी पुढीलप्रमाणे.
पायाभूत सुविधेंतर्गत रस्ते विकसन (रु.214 कोटी) रु.50 कोटी
पायाभूत सुविधेंतर्गत रस्ते विकसन (रु.391 कोटी) रु.50 कोटी
विकास आराखडयातील रस्ते बांधणे रु.60 कोटी
यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने रस्ते नुतनीकरण रु.60 कोटी
मिसिंग लिंक रु.40 कोटी
रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण रु.45 कोटी
रस्ता रुंदीकरण व नुतनीकरण रु.25 कोटी