Thane Metro Train Trial Run: ठाण्याची मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज, आज रात्री क्रेनने डबे ट्रॅकवर उतरवणार, 10 स्थानकं, जाणून घ्या ए टू झेड माहिती
Thane Metro Train Trial Run: मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.

Thane Metro Train Trial Run: ठाणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा (Thane Metro) आता प्रत्यक्ष धावण्यासाठी सज्ज झाली असून, सप्टेंबर महिन्यात मेट्रो लाईन 4 आणि 4-अ या मार्गांवरील पहिल्या टप्प्याची ट्रायल रन (Thane Metro Train Trial Run) होणार आहे. मेट्रो प्रकल्प राबवणाऱ्या एमएमआरडीएने (MMRDA) ट्रायल रनसाठी आवश्यक त्या तयारीला अंतिम स्वरूप दिले आहे.
मेट्रो डबे पोहोचले मार्गावर, ट्रॅकवर ठेवण्याचे काम सुरू (Thane Metro)
आज या मार्गावर काही मेट्रो (Metro) डबे विविध स्थानकांवर पोहोचवण्यात आले. उर्वरित डबे आज रात्री ट्रॅकवर ठेवण्यात येणार आहेत. हा मार्ग उन्नत (elevated) असल्यामुळे विशेष क्रेनच्या सहाय्याने डबे ट्रॅकवर चढवले जात आहेत. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत दक्षतेने पार पडत असून, यामुळे लवकरच ट्रायल रन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
युद्धपातळीवर सुरू आहे काम
मेट्रो लाईन 4 आणि 4-अ या मार्गिकांवरील 10.5 किमीच्या पहिल्या फेजचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ट्रायल रनसाठी 10 स्थानकांवरील काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे.
ट्रायल रन होणारी 10 प्रमुख स्थानके
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ट्रायल रनमध्ये खालील 10 स्थानकांचा समावेश आहे:
1 कॅडबरी
2 माजीवाडा
3 कपूरबावडी
4 मानपाडा
5 टिकुजी-नी-वाडी
6 डोंगरी पाडा
7 विजय गार्डन
8 कासरवाडावली
9 गोवानिवाडा
10 गायमुख
या मार्गिकेचा उपयोग ठाणे शहर आणि त्याच्या उपनगरांतील लाखो प्रवाशांसाठी होणार असून, भविष्यात हा मार्ग मुंबईतील इतर मेट्रो मार्गांशी जोडण्यात येईल, असा एमएमआरडीएचा मानस आहे.
प्रवास अधिक सोयीस्कर होणार
दरम्यान, मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाल्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही मेट्रो मार्गिका कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या सुमारे १० किलोमीटर अंतरावर ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. अद्याप ट्रायलची अचूक तारीख निश्चित झालेली नसली, तरी सप्टेंबर महिन्यात ती कधीही पार पडण्याची शक्यता आहे. यामुळेच आता ही मेट्रो प्रत्यक्ष धावताना पाहण्यासाठी ठाणेकरांमध्ये उत्सुकता वाढली असून, ट्रायल रनच्या साक्षीदार होण्यासाठी नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या























