Thane Election : पत्नीला उमेदवारी, पण पतीची बंडखोरी, आईला तिकीट अन् मुलाची बंडखोरी; ठाण्यात महायुतीतच दोस्तीत कुस्ती
Thane Election News : ठाण्यात अनेक ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात शिंदेंच्याच शिवसेनेचे बंडखोर उमेदवार, तसेच भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी बंडखोरी झाल्याचं दिसून येतंय.

ठाणे : ठाण्यात महायुतीतच बंडखोरीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय. पत्नीला अधिकृत उमेदवारी मिळूनही पती बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात उतरली आहे. तर अनेक माजी नगरसेवक-नगरसेविकांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी आपल्याच किंवा मित्रपक्षांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत वरिष्ठ नेत्यांचे मनधरणीचे फोनही या उमेदवारांनी उचलले नाहीत. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच ‘दोस्तीत कुस्ती’ पाहायला मिळणार आहे. याचा फटका नेमका कोणाला बसतो, हे चित्र आता16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
Thane News : पत्नीला उमेदवारी, तरीही पतीची बंडखोरी
ठाणे महापालिकेसाठी एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. घोडबंदर रोड येथील प्रभाग क्रमांक एक ड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख रवी घरत अपक्ष बंडखोर म्हणून रिंगणात आहेत. या ठिकाणी शिंदेंच्याच शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून रवी घरत रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, रवी घरत यांच्या पत्नी नम्रता घरत या पॅनलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत.
मनोरमानगर येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर आणि जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेतून निलंबनाची कारवाई केल्यानंतर उमेदवारी मिळालेले विक्रांत वायचळ, शाखाप्रमुख लहू पाटील, माजी नगरसेविका पद्मा भगत रिंगणात आहेत.
Eknath Shinde Shivsena : युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची बंडखोरी
प्रभाग क्रमांक चार ड मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सिद्धार्थ पांडे यांच्याविरूद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी नितीन लांडगे यांनी बंडखोरी केली. या प्रभागात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष जयस्वाल रिंगणात असल्याने तिरंगी लढतीची शक्यता आहे.
Thane Shivsena News : आईची उमेदवारी, पण पुत्राची बंडखोरी
या प्रभागातच भाजपचे मुकेश मोकाशी यांच्याविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे पुत्र विकी पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. विकी पाटील यांच्या आई प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा गड असलेल्या टेंभीनाका येथून शिवसेनेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. येथील प्रभाग क्रमांक 22 ड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पवन कदम यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर विकास दाभाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
या सगळ्या लढती पाहता, एकंदरीत ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात शिंदेंच्याच शिवसेनेचे बंडखोर उमेदवार, तसेच भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी बंडखोरी झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली असून त्याचा फटका कुणाला बसतो याचे चित्र 16 जानेवारीला स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा:























