Thane : एक दिवसाची सुट्टी घेऊन चार दिवस आलीच नाही, मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेवर बंदूक रोखली, ठाण्यातील घटना
Thane Crime : घरकामावरुन झालेल्या वादावेळी मालकिणीच्या मुलाने मोलकरीणीच्या कुटुबीयांवर बंदूक रोखली. पण ती बंदूक खोटी असल्याचं समोर आलं.

ठाणे : एक दिवसांची सुट्टी घेऊन चार दिवस घरकाम करण्यासाठी न आल्याने घर मालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेमध्ये वाद झाला. या वादात घर मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना ठाण्यातील कासारवडवलीमध्ये घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी घर मालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ती बंदूक खरी नसून अगदी बंदुकीसारखा हुबेहूब दिसणारा लायटर असल्याचे निष्पन्न झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोड येथील वाघबीळमधील जानगिड गॅलॅक्सी टॉवरमध्ये राहणाऱ्या घर मालकीण मोनिका शर्मा यांच्या घरी एक महिला गेल्या 6 महिन्यांपासून घर काम करते. या घरकाम करणाऱ्या महिलेने 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त एका दिवसांची सुट्टी घेतली. मात्र, चार दिवस उलटूनही ती महिला कामावर गेली नाही.
Thane Crime : चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
घरकाम करणाऱ्या मोलकरीणीला वारंवार फोन करुन देखील ती फोन उचलत नव्हती. त्यानंतर मोनिका शर्मा यांनी मंगळवारी पुन्हा घरकाम करणाऱ्या महिलेला फोन केला. यावेळी घरकाम करणाऱ्या महिलेने फोन उचलताच संतापलेल्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलाने तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
मोनिका शर्मा यांच्या मुलाने त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला जिथे असाल तिथून उचलून आणू अशी धमकी दिली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडित महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगितला. यावेळी पीडित महिलेचे नातेवाईक घडलेल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी घर मालकीणीच्या घराखाली गेले. यावेळी मोनिका शर्मा आणि तिच्या मुलासोबत त्यांचा मोठा वाद झाला.
Thane News : महिलेच्या कुटुंबीयांवर बंदूक रोखली
यावेळी मोनिका शर्मा यांच्या मुलाने पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांना धाक दाखवण्यासाठी बंदूक रोखली. या प्रकाराने पीडितेचे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी याबाबतची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरु केली.
दरम्यान, धाक दाखवण्यासाठी वापरण्यात आलेली ती बंदूक खरी नसून बंदुकीसारखा हुबेहूब दिसणारा लाईटर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी घर मालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्त्यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पीडित महिलेने देखील घडलेला सर्व प्रकार सांगत घर मालकीणीने कॉलवर दिलेल्या धमक्यांचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे सादर केलं आणि या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















