शिंदे आणि ठाकरे वादाचा फटका धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला, ठाणे महापालिकेने ठोकले ताळे
शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटांचे वाद आता अगदी तळागाळात येऊन पोहचले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रशासनाचा वापर देखील केला जात आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन गटांच्या वादात आता सामान्य शिवसैनिक भरडला जातोय असे चित्र समोर येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनीच सुरु केलेल्या व्यायामशाळेला पालिकेने सील ठोकले आहे. मात्र केवळ शिवसैनिक असल्यानेच आपल्या संस्थेला महापालिकेने टार्गेट करत असल्याचे ही व्यायाम शाळा चालवत असलेल्या शिवसैनिकांचा दावा आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून प्रेरणा घेत सावरकरनगर येथे 25 वर्षांपूर्वी एक हजार चौ फुट जागेत व्यायामशाळा सुरु करण्यात आली. सध्या नाममात्र शुल्क घेऊन शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्था याचे व्यवस्थापन पाहते. कोरोना काळात जवळपास दोन वर्ष व्यायामशाळा बंद होती. आता व्यायाम शाळा सुरू झाल्यावर सुमारे 67 हजार रुपये एवढे भाडे भरा, अशी नोटीस ठाणे महानगरपालिकेने व्यवस्थापनाला पाठवली. व्यवस्थापनाने त्यातील 15 हजार रुपये भरून उर्वरित रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवस मुदत मिळवली. मात्र असे असताना शुक्रवारी अचानक पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या व्यायामशाळेला सील ठोकले. त्यामुळे आपण ठाकरे समर्थक शिवसैनिक असल्यानेच पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून दबाव आणण्यासाठी ही कारवाई झाल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर यांनी केला आहे.
तर सदर व्यायामशाळेचे भाडे थकले होते तसेच पालिकेने दिलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिकारी महेश आहेर यांनी दिली. शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटांचे वाद आता अगदी तळागाळात येऊन पोहचले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रशासनाचा वापर देखील केला जात आहे. मात्र यामुळे स्थानिक व्यायम प्रेमी तरुणांचे नुकसान होत आहे. तसेच धर्मवीरांच्या विचारांना तिलांजली देखील देण्यात येत आहे.