''मंदिर-मस्जिद, गुरुद्वाराचं रक्षण करणं हा तुमचा माझा विचार'', भिवंडीतून पवारांचा मोदींवर पलटवार
आज एका ठिकाणी त्यांनी बोलत असताना सांगितलं, की उद्या आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली, तर आयोध्येचं जे मंदिर आहे ते संकटात येईल.
ठाणे : देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाही ला संपवण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.ते महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेतील (Bhiwandi) उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी पोगावं येथे आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. या सभेस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे खासदार संजय सिंह,खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या भाषणातून शरद पवार यांनी मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला.देशातील मंदिर-मस्जिद, गुरुद्वारा यांचं रक्षण करणं हाच तुमचा माझा विचार असल्याचे शरद पवारांनी म्हटलं.
आज एका ठिकाणी त्यांनी बोलत असताना सांगितलं, की उद्या आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली, तर आयोध्येचं जे मंदिर आहे ते संकटात येईल. या देशाचे मंदिर असो, मस्जिद असो, गुरुद्वार असो या सगळ्यांचे रक्षण करणे हा विचार तुमचा आणि माझा सगळ्यांचा आहे, कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून लोकांमध्ये एक प्रकारचं अंतर वाढवण्याचं काम मोदी करत आहेत आणि हे देशाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. , अशा परिस्थितीत बाळ्या मामा यांच्य मागे ताकदीने उभे राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
निवडणुकीत पराभव समोर दिसत असताना मोदी यांनी खोट्या केसेसमध्ये अडकवून मला कारागृहात टाकले,जामिनावर बाहेर असताना दिवसरात्र मेहनत करून 21 दिवसात भाजपाला पराभूत करूनच कारागृहात परत जाईल, असा निर्धार व्यक्त करीत देशाला वाचविण्यासाठी मतदानाची भिक मागण्यासाठी मी भिवंडीत आलो आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. दिल्ली येथील गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण,मोफत वीज,मोफत रुग्णालय उपचार मोफत औषध देण्याचे काम आम्ही करतो. दिल्लीमध्ये 500 मोहल्ला क्लिनिक बनवल्या, मोदी यांनी देशभरात 5000 मोहल्ला क्लिनिक सुरू केले असते तर त्यांचा सन्मान केला असता. रशियाचा नेता पुतीन याने विरोधकांना मारले, कारागृहात टाकले,बांगलादेश व पाकिस्तानमध्ये सुध्दा असेच करुन सत्ता हस्तगत केली, भारताकडून जग शिकते पण मोदी बांगलादेश पाकिस्तान यांच्या कडून शिकून तसेच काम भारतात करू इच्छितात असा आरोपदेखील केजरीवाल यांनी जाहीर सभेतून केला. नरेंद्र मोदी हे भयग्रस्त असून पक्षात 75 वर्षांवरील नेत्यांना राजकारणातून निवृत्ती देणार पुढील वर्षी मोदी सुध्दा 75 वर्षांचे होणार असल्याने ते मत मागत आहेत ते अमित शहा यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी हे नागरिकांनी लक्षात घ्यावे आणि महाविकास आघाडीचे बाळ्या मामा प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शेवटी केजरीवाल यांनी केले.
जयंत पाटील, आव्हाड यांचीही भाषणे
भिवंडी शहराला रस्ते वीज पाणी आणि मामा या गोष्टी महत्त्वाच्या असून बाळ्यामामा यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला व इंडिया आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याची गरज आहे.या देशात गरीब सर्वात जास्त कर भरत असून श्रीमंत सर्वात कमी कर भरत आहेत. त्यामुळे जीएसटीत सुधारणा करणार व भिवंडीत विकास कामे करणार असे आश्वासन यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. भिवंडीतील खासदार हे हप्ताखोर,दादागिरी करणारे व टक्केवारी घेणारे असून शहरातील व गावातील गोदामे वाचवायचे असेल तर बाळ्या मामांना विजयी करा असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.
ही निवडणूक गावकीची, भावकीची नाही, ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची आहे असे सांगत मंदिर, मस्जिद,मुसलमान,मंगळसूत्र या चार म वर नरेंद्र मोदी यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे, असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी म्हटले. तसेच, लाखों का चष्मा,करोड का सूट सुबह से लेकर झूठ ही झूठ असा नाराही त्यांनी दिला.