Kalyan: उधार दिलेले पैसे मागितले म्हणून निवृत्त टीसीची सर्पदंश देऊन हत्या, या आधीही सर्पदंशाने एकाची हत्या; सर्पमित्रासह पाच आरोपी अटकेत
उसनवारीतून रेल्वेच्या निवृत्त टीसीसह आणखी एका व्यक्तीची विषारी सर्पदंश देऊन हत्या केल्याची घटना शहापुरात घडली आहे. या प्रकरणी सर्पमित्रांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.
Crime News: शहापूर तालुक्यातील सेवानिवृत्त रेल्वे टीसीने अनेकांना उसनवारीवर पैसे दिले होते, पण ज्यावेळी टीसीने पैसे परत करण्यासाठी सांगितले, त्यावेळी उसनवारी घेणाऱ्या एका आरोपीने साथीदारांसह सर्पमित्रांच्या मदतीने विषारी सर्पदंश देऊन टीसीची गळा चिरून निर्घृण हत्या (Murder) केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात पुरुन ठेवला. शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या एका शेतात ही घटना घडली. या भयानक हत्येचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला (Crime News) यश आलं असतानाच, याच आरोपींनी आणखी एका व्यक्तीची पैशांच्या वादातून विषारी सर्पदंश देऊन हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
आतापर्यंत 5 आरोपींना अटक
पोलिसांनी दोन्ही हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. गुन्हे शाखा पथक फरार आरोपीचा शोध घेत आहेत. अरूण फर्डे आणि सोमनाथ जाधव अशी सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर गणेश खंडागळे, नारायण भोईर, जयेश फर्डे असे अटक केलेल्या सर्पमित्र असलेल्या आरोपींची नावं आहेत. तर रमेश मोरे ( रा. टिटवाळा) असं फरार असलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तर गोपाळ रंगया नायडु (वय 62, रा. चक्की नाका, कल्याण पूर्व) असं निर्घृण हत्या झालेल्या सेवानिवृत्त टीसीचं नाव आहे. तर, भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात राहणारे बाळू पाटील यांचीही पैशांच्या वादातून विषारी सर्पदंश देऊन हत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह खड्ड्यात पुरल्याचं आलं समोर
ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जून रोजी शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत अटक आरोपी अरुण फर्डे यांच्या शेतात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या स्थितीत मिळून आला होता, या घटनेची माहिती शहापूर पोलीस पथकाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तहसील प्रशासन, शासकीय डॉक्टर, अधिकाऱ्यांच्या उपस्थित शेतातील खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हल रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करून मृतदेहाची ओळख पटवण्याचा तपास सुरू केला.
अंगठीवरुन पटली मृतदेहाची ओळख
हा हत्येचा भयानक प्रकार असल्याचं लक्षात आल्यानंतर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी सदर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस पथकं तयार केली. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून आरोपींनी मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या होत्या. तर, मृतकाच्या अंगावर केवळ बनियान आणि अंडरवेअर होते, त्यामुळे मुतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलीस पथकासमोर होते. तपासादरम्यान मृतदेहाचा अहवाल आल्यानंतर टीसीची विषारी सर्पदंश करून त्यांची शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याचे समोर आले. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे फोटो, वर्णन आणि नाव प्राप्त केले, त्यानंतर मृतदेहाच्या हातातील बोटात असलेल्या अंगठीवरून ओळख पटवली असता मृतक कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे राहणारा गोपाळ रंगया नायडु असून ते सेवानिवृत्त टीसी असल्याचे निष्पन्न झाले.
हत्या केल्याची दिली कबुली
मृत गोपाळ हे 3 जून पूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने मृतकाच्या नातेवाईकांना मृतदेह दाखवला असता त्यांनी गोपाळ नायडु यांचाच मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक तपास करुन हत्या करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला, त्यानंतर आरोपींनी हत्येची कबुली दिली.
उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने दोघांची हत्या
धक्कादायक बाब म्हणजे फरार मुख्य आरोपी मोरे याने मृतक गोपाळ यांच्याकडून 16 लाख रुपये उसने घेतले होते. तर त्याचवेळी भिवंडी तालुकयातील पडघा येथे राहणारे बाळू पाटील यांचीही पैशांच्या देवाण-घेवाणीतून विषारी सर्पदंश करून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले. उसने पैसे परत मिळण्यासाठी मृतक गोपाळ, बाळू पाटील हे मुख्य आरोपी मोरे याच्याकडे तगादा लावत होते, त्याचाच राग मनात धरुन मुख्य आरोपीने सर्पमित्र आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मुख्य आरोपीचा शोध अद्यापही सुरू
3 जून रोजी मृत गोपाळ यांना उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या आरोपी अरुण फर्डे याच्या शेतात नेऊन दारूची पार्टी केली. त्यानंतर गोपाळ यांना विषारी नागाचा सर्पदंश देऊन नंतर त्यांचा शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली, त्यांचा मृतदेह शेतातील एका खड्यात पुरल्याचे निष्पन्न झाले. तसेच याच आरोपींनी पडघा येथे राहणाऱ्या बाळू पाटील यांचीही पैशांच्या व्यवहारातून सर्पदंश देऊन हत्या केल्याचं समोर आल्याने अटक आणि फरार आरोपींविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात भादवि कलम 302, 201, 34 प्रमाणे दुहेरी हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
हेही वाचा: