Mira Bhaindar: महापालिकेने लावला न्यायालयाच्या जागेवर 91 लाखांचा कर, कर माफीसाठी खुद्द न्यायाधिशांची विनंती
Mira Bhaindar Latest News: पालिकेने मोकळ्या जागेच्या करापोटी न्यायालयाकडून 91 लाख पालिकेत जमा करण्याचं पत्र दिलं आहे.
Mira Bhaindar Latest News: मिरा-भाईंदर महानगरपालिकेने न्यायालयाच्या मोकळ्या जागेलाच 91 लाखाचा कर लावला असून जागेचा कर माफ करण्याची विनंती न्यायाधिशांना पालिकेकडे करावी लागली आहे. पालिकेनेही नियमात जे बसेल तेवढी मदत करण्याच आश्वासन दिलं आहे. तर विरोधकांनी पालिकेच्या कारभाराबाबत आक्षेप घेतला आहे. धनाड्य बिल्डरांना कर माफी देता मग जनतेसाठी असणाऱ्या सरकारी जागाना कर माफी का नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
मिरा भाईंदर शहरात दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे काम गेल्या 2014 पासून सुरू आहे. यासाठी पालिकेने बांधकाम परवानगी ही दिली आहे. दरम्यानच्या काळात न्यायालयाचे काम ठप्प झाले होते. यामुळे पालिकेने मोकळ्या जागेच्या करापोटी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला 91 लाख एक हजार 192 रुपये रक्कम पालिकेत जमा करण्याबाबतचे पत्र, 8 मे रोजी पाठविले होते. पीडब्ल्यूडी विभागाने त्याची माहिती जिल्हा सत्र न्यायालयाला दिली असता जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायधीशांनी पालिकेला नुकतेच पत्र पाठवून मोकळ्या जागेचा संपूर्ण कर माफ करण्याची मागणी आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे. महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी विभागाकडे माहिती मागवली असल्याचे सांगितले आहे. महापालिकेकडून जेवढी सवलत देता येईल, तेवढी सवलत देण्याच आश्वासन दिलं आहे.
भाजपचे माजी नगरसेवक ओमप्रकाश गरोडिया यांनी महापालिकेवर निशाणा साधताना ही माहिती दिली की, भाईंदर पश्चिमेतील एका बिल्डरचा एक कोटीहून अधिकचा ओपन लँड टॅक्स महापालिकेन माफ केला होता. जेव्हा महापालिका हे माफ करू शकते, तर सरकारी इमारतीच्या बांधकामाचा ओपन टॅक्स का माफ करू शकत नाही? असा सवाल उपस्थित करुन या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप ओमप्रकाश गरोडिया यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मीरारोड येथे न्यायालयासाठी आरक्षित असलेल्या घोडबंदर येथील सर्वे क्रमांक 233 वरील 4 हजार 353 चौरस मीटर क्षेत्र पीडब्ल्यूडी विभागाला उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
मिरा रोडमध्ये नालेसफाईचा बोजवारा
मिरा रोडच्या नया नगर येथील बॅक रोड जवळ रेल्वे लाईनच्या समांतर मुख्य नाला गेला आहे. त्या नाल्यावर सुशोभिकरणाच्या नावाखाली पालिकेने सेल्फीपॉईंट बनवलं आहे. त्या सेल्फिपॉईंटच्या खाली रेल्वे लाईनच्या खालून, पूर्व-पश्चिमेला जोडणारा नाला आहे. पावसाला सुरु झाला असला तरी अद्यापही हा नाला साफ केला नसल्याच दिसून येत आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने मिरा भाईंदर मध्ये पावसाचे पाणी साचण्याची भिती नागरीकांनी व्यक्त केली आहे.
मुख्य नाल्यावर बांधण्यात आलेल्या या सेल्फी पॉंईटला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. आता हा सेल्फी पॉईट चरीस गर्दुल्यांचा अड्डा बनत चालला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हा सेल्फी पॉईट बंद आहे. येथील नाला साफ करण्याच्या नावाखाली सेल्फी पॉंईट बंद करुन नाल्यावरील झाकणे काढली आहेत.