Accident News : कोकणात जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; पोलादपूरजवळील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Accident News : पोलादपूर आज सकाळी कार आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये शोककळा पसरली आहे.
Accident News : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. अंबरनाथच्या सावंत कुटुंबीयांच्या कारचा पोलादपूरजवळ (Accident near Poladpur) भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कोकणात जाण्यासाठी अनेकजण खासगी वाहनांचा वापर करत असल्याने पहाटेच्या सुमारास प्रवासाला निघतात. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
अंबरनाथच्या आनंद पार्क परिसरात जयवंत सावंत हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी गणेशोत्सवासाठी जात असताना हा अपघात झाला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सावंत कुटुंब अंबरनाथहून रवाना झालं आणि काही तासातच पोलादपूरजवळ त्यांच्या एर्टीगा कारची शिवशाही बससोबत भीषण धडक झाली. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलीस आणि स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात कारमधील जयवंत सावंत (60), किरण घागे (28) या दोघांचा मृत्यू झाला. तर गिरीश सावंत (34), जयश्री सावंत (56) आणि अमित भीतळे (30) हे तिघे जखमी झाले आहेत. या सर्वांना आधी नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे सध्या तिन्ही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था असल्यानं कोल्हापूरमार्गे जाण्याचा सल्ला सावंत कुटुंबियांना निकटवर्तीयांनी दिला होता. मात्र, कोल्हापूर मार्गे गावी जाण्यास अधिक अंतर असल्याने सावंत यांनी गोवा महामार्गानेच जाणं पसंत केलं असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. या घटनेमुळे परिसरात आणि सावंत यांच्या गावी शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवाआधी हा दुर्देवी अपघात झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कोकणवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे कोकणवासियांनी संताप व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: