Maharashtra Politics: आधी शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांसोबत बैठक, मग फडणवीसांसोबत अर्धा तास चर्चा, अन् मध्यरात्री अचानक मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेनं रवाना, पुन्हा नवा ट्वीस्ट?
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट येणार? मध्यरात्री मुख्यमंत्री अचानक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले असून नेहमीची गाडी टाळत दुसऱ्याच गाडीनं रवाना
Maharashtra NCP Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) येथील मेळव्यानंतर तब्बल एक तास आमदारांशी चर्चा केली. एकंदरीतच ठाण्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार, मंत्री शिंदेंच्या निवास्थानाहून रवाना झाले अन् काही वेळानं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. त्यानंतर मध्यरात्री अचनाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. महत्त्वाचं म्हणजे, त्यावेळी ते नेहमी ज्या गाडीनं प्रवास करतात त्या गाडीनं प्रवास न करता ते दुसऱ्याच गाडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले.
सध्या राज्याच्या राजकारणातील समीकरणं पूरती बदलली असून सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा दिसून येत आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 12 दिवस लोटले तरिदेखील त्यांचा खातेवाटप प्रलंबित आहे. खातेवाटपावरुनच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये चढाओढ दिसत आहे. अजित पवारांच्या येण्यानं शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार नाराजही आहेत. याबाबत आमदारांनी खुलेपणानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, शिवसेनेतील अनेक आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. अनेकांनी तर मंत्रिपद मलाच मिळणार, असा दावाही केला आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवारही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटात काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप याबाबत शिंदे गटात असलेली नाराजी दूर करण्यासाठीच फडणवीस यांनी ही धावती भेट तर घेतली नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच फडणवीसांना नाराजी कमी करण्यात यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अजित पवार, अमित शाह यांच्यातील दिल्ली भेटीची इन्साईड स्टोरी
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तिघांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. मात्र अर्थ मंत्रालयासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय शपथविधी होऊन 11 दिवस उलटले तरी खातेवाटप न झाल्याचीही चर्चा झाली. तसेच, राष्ट्रवादीच्या कायदेशीर लढाई लढण्याबाबतही अजित पवारांनी अमित शाहांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
खातेवाटपावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच आता मात्र खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात काल (बुधवारी) दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाकडून खाते वाटपाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत झालं असून तिनही पक्षांच्या सहमतीनं अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिनही पक्षांमध्ये सहमती झाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :