Kapil Patil : भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा
Kapil Patil : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईतील सहा जागांसह भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, धुळे, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. भिवंडी (Bhiwandi) लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि अधिकारी पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बाळ्यामामा म्हात्रे यांनी निवडणूक लढवली.
अखेर कपिल पाटील यांच्यावर गुन्हा
भिवंडी शांती नगर पोलीस ठाण्यात भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर पोलिसांना केलेली शिवीगाळ कपिल पाटील यांना भोवली आहे. कपिल पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 186,504,506, कलमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामात अडथळा तसेच अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, दादा गोसावी, भाजपचा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील आणि रवी सावंत या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीतील अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर कपिल पाटील तिथं पोहोचले होते. यावेळी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर टीका करण्यात आली होती.
भिवंडीत तिरंगी लढत
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांच्यापुढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी आव्हान निर्माण केलं आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे लोकसभेच्या रिंगणात आहेत. भिवंडी करांनी लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान केलंय याचा निकाल 4 जूनला स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
Lok Sabha Election 2024 : भिवंडीत बोगस मतदानाचा सुळसुळाट; भाजप उमेदवाराचा खळबळजनक आरोप, म्हणाले....