महापालिकेच्या खंडणीखोर ड्रायव्हरसह माहिती अधिकाऱ्यांची देखील चौकशी?; तपास खंडणीविरोधी पथकाकडे
माहिती अधिकार कार्यकर्त्यांबरोबर यापूर्वीच्या पालिकेच्या प्रभागांमधील तत्कालीन साहाय्यक आयुक्तांच्या चौकशा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तीन माहिती कार्यकर्त्यांनी किती विकासकांच्या बांधकामांच्या विरोधात कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. विकासक प्रफुल्ल मोहन गोरे यांच्या इमारत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी किती माहिती अर्ज लावले आहेत. पालिकेच्या अ प्रभागातील वाहन चालक विनोद मनोहर लकेश्री यांच्या विरुध्द नागरिकांकडून पालिकेत किती तक्रारी करण्यात आल्या आहेत, अशी सर्वंकष माहिती पालिका प्रशासनाने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे दाखल केली आहे. या माहिती अर्जांची विविध अंगाने तपासणी करून खंडणी विरोधी पथक बेकायदा बांधकामांचे मूळ आणि त्याचे खरे लाभार्थी कोण याचा शोध घेणार असल्याचे समजते. यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांबरोबर यापूर्वीच्या पालिकेच्या प्रभागांमधील तत्कालीन साहाय्यक आयुक्तांच्या चौकशा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या महिन्यात डोंबिवलीतील विकासक प्रफुल्ल मोहन गोरे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील वाहन चालक कामगार विनोद मनोहर लकेश्री, माहिती कार्यकर्ते प्रशांत शिंदे, विलास शंभरकर, परेश शहा आणि महेश दत्तात्रय निंबाळकर यांच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ठाणे येथील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाने पालिका आणि कामगार लकेश्री यांच्याशी संबंधित काही कर्मचाऱ्यांच्या चौकशा केल्या आहेत. डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा, कोपर, दत्तनगर अशा विविध भागातील आपल्या बांधकामाच्या संदर्भात आरोपींनी आपल्याकडून खंडणी घेतल्याची विकासक गोरे यांची तक्रार आहे. या प्रकरणाची खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल होताच, आरोपी लकेश्री फरार झाला होता. त्याला अलीकडेच अंतरिम जामीन न्यायालयाने दिला आहे. त्यांनी आपला जबाब खंडणी विरोधी पथकाकडे नोंदविला आहे.
पालिकेतील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात?
माहिती कार्यकर्ते शिंदे, निंबाळकर, शंभरकर यांनी पालिकेत डोंबिवलीतील किती विकासकांच्या बांधकामांची माहिती मागवली आहे. गोरे यांच्या बांधकामांवर कारवाईसाठी किती अर्ज केले आहेत. किती प्रकरणात आरोपींनी आपले अर्ज समाधान झाले म्हणून मागे घेतले आहेत. तसेच, विनोद लकेश्री यांच्याविरुध्द नागरिकांकडून पालिकेत किती तक्रारी आल्या आहेत. या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाला तपास करायचा असल्याने तपास अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांनी आयुक्त डॉ. जाखड यांना आरोपींसंदर्भातील माहिती अधिकार अर्जाची माहिती देण्याची मागणी केली होती. या मागणीप्रमाणे पालिकेने आरोपीसंदर्भातील माहिती अधिकार अर्जांची एक नस्ती खंडणी विरोधी पथकाकडे दाखल केली आहे. आता या अर्जांच्या अनुषंगाने तपास होऊन पालिका मुख्यालय, डोंबिवलीतील ग, फ, ह आणि ई प्रभागातील काही तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. तत्कालीन काही वरिष्ठही चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. एका पालिका अधिकाऱ्याने खंडणी विरोधी पथकाने मागविलेली समग्र माहिती देण्यात आली आहे, असे सांगितले. पथकातील अधिकाऱ्याने या अर्जांच्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे, अशी पुष्टी दिली.