Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
Road Accident in Kalyan: कल्याणमध्ये बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.
कल्याण: कल्याणमध्ये आई आणि लहान मुलाला एका ट्रकने उडवल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा अपघात घडला. यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकने मायलेकराला उडवले. या धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबविली महानगरपालिकेचा होता. मात्र, या अपघातानंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. याविरोधात माजी आमदार प्रकाश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकअपच्या धडकेत 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास स्टेशन रोडवरील म्हसोबा चौक परिसरात ही घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे . श्रेया हरिश्चंद्र दुसाने (वय 15, वर्षे राहणार आनंदनगर) असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे.
या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रेया ही सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आनंदनगर येथून शिवप्रतापनगर येथे ट्युशनसाठी जात असताना म्हसोबा चौक परिसरात रास्ता ओलांडत असताना भरधाव पिकअपने तिच्या सायकलला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला उपस्थित नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
आणखी वाचा
मोठी बातमी: शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात, मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक