(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्सव देखाव्यातून राजकीय भाष्य; लोकशाही धोक्यात असल्याचा संदेश, पोलिसांनी बजावली नोटीस
Ganeshotsav 2023 : कल्याणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दिल्लीश्वर अर्थात केंद्र सरकारच्या दबाबामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे भाष्य करण्यात आले आहे.
कल्याण : सार्वजनिक गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi) समाजप्रबोधनासाठी देखावे सादर करण्यात येतात. काही देखाव्यांच्या माध्यमातून राजकीय भाष्यही करण्यात येते. तर, काही ठिकाणी राजकीय पक्षांशी थेट संबंधित असलेल्या मंडळांच्या देखाव्यातून राजकीय भाष्य करताना विरोधकांवर टीकाही केली जाते. कल्याणमधील सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळाकडून दिल्लीश्वर अर्थात केंद्र सरकारच्या दबाबामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे भाष्य करण्यात आले आहे.
कल्याणमधील विजय तरुण मंडळाचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोकशाहीचे चारही खांब प्रचंड दबावाखाली आहेत. दिल्लीश्वर म्हणजेच भाजपकडून दबाव टाकला जात आहे. विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर कसा दबाव टाकला जात आहे. हा देखावा कल्याणमध्ये साकारण्यात आला आहे. कल्याणच्या विजय तरुण मंडळाकडून या देखाव्यास पोलिसांनी नोटीस बजावली आहे. विजय साळवी हे या मंडळाचे विश्वस्त असून आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख ही आहेत. लोकशाहीची होणारी गळचेपी दाखवणारा हा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे.
कल्याणमधील विजय तरुण मंडळ हे 60 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात. मंडळाकडून समाज प्रबोधनात्मक आणि ताज्या घडामोडींवर आधारीत देखावे सादर केले जातात. गेल्या वर्षी शिवसेनेतील पडलेल्या फूटीवर देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्याचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. काही आक्षेपार्ह बाबी वगळून हा देखावा साकारला गेला होता. या वर्षीही या मंडळाकडून भारतात लोकशाहीची गळचेपी होत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या देखाव्याबाबत मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयावर सजावट करतो. वर्षभरात घडलेल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर हा देखावा तयार केला जातो. लोकशाहीचे चार खांब आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्यामुळे ते योग्य न्याय देऊ शकत नाहीत. या देखाव्यातून आम्ही असे दाखविले आहे की, भारतातील लोकशाही ही एका दबाव तंत्रात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. स्वीडनने एक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, भारतातील लोकशाही ही धोक्यात आली आहे. यामध्ये चार खांब दाखविले आहेत. विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे चार खांब कसे दाबले जात आहे. हे सांगितले आहे. सध्या जे भाजपचे सरकार आहे. ते पूर्ण लोकशाही दाबून टाकत आहे. हुकूमशाही पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, राजकीय भाष्य दाखवणाऱ्या देखाव्यामुळे पोलिसांनी मंडळाला कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. मंडळाने सादर केलेल्या देखाव्यामुळे काही गटामध्ये द्वेष निर्माण झाला तर मंडळ जबाबदार असेल अशा आशयाची नोटीस आहे. पोलिसांनी अशी नोटीस दिली असली तरी आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करणार असे विजय साळवी यांनी सांगितलं आहे.