Shiv sena : कल्याणात शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का, विश्वनाथ भोईर यांना शहरप्रमुख पदावरून हटवलं
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मला कल्पना होतीच, नवीन शहरप्रमुखाना शुभेच्छा, मी आजन्म शिवसैनिकचं अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा आता तिसरा अंक रंगू लागला आहे. शिंदे यांच्या बंडात सुरुवातीपासून सहभागी असलेले कल्याण शहरप्रमुख आमदार विश्वनाथ भोईर यांना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदावरुन हटवलं आहे. त्यांच्या जागी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि तीन वेळा नगरसेवक असलेले सचिन बासरे यांची निवड करण्यात आल्याचे आपल्या अधिकृत सामना या मुखपत्रातून जाहीर केले आहे. याबाबत बासरे यांनी कोण गेलं याचा विचार करणार नाही, कोण आहेत आणि कोण आमच्यासोबत येणार त्यांना सोबत घेवून संघटनेच काम करेन. सर्वसामान्य जनता शिवसेनेवर प्रेम करते आणि करत राहणार असे सांगितले. तर याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मला याबाबत कल्पना होतीच, पदावरून काढलं असलं तरी मी आजन्म शिवसैनिक राहणार अशी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आपण शिवसैनिकच असल्याचा दावा करत आहेत. मुंबई, ठाणे पाठोपाठ राज्यातील विविध शहरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात सहभागी होत प्रवाहाबरोबर पुढे जाण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र खरी शिवसेना कोणाची याबाबत शिवसैनिकांच्या मनात आजही संभ्रम आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होत असल्याने महत्वाच्या पदावर पदाधिकाऱ्याची नियुक्ती करत संघटना मजबूत करण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. बंडखोरीनंतर परतलेले आमदार भोईर यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना कल्याण शहरप्रमुख पदाचा मी राजीनामा देणार नसून आपल्याला या पदावर उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केले आहे. त्यामुळे या पदावरून आपल्याला हटविण्याचा अधिकार त्यांनाच असल्याचे सांगितले होते. तर महाविकास आघाडी सरकार संपविण्यासाठी आपण शिंदे यांना समर्थन दिले तर आपण गद्दार कसे? असा सवाल देखील त्यांनी केला होता. यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भोईर यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान बासरे यांच्या नावाची अनेक दिवसापासून चर्चा होती. आज अखेर त्यावर शिक्का मोर्तब झाले. तर याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांनी बासरे यांना शहर प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देतो, मी शिवसैनिक आहे. आजन्म शिवसैनिक राहणार , जे आमदार बाहेर पडलेत त्यांना बऱ्याच लोकांना पदावरून काढून टाकलंय, काही दिवसांनी मला देखील शहरप्रमुख पदावरून काढून टाकतील याची कल्पना मला होती, या बाबत शिंदे साहेबाना कळवले असल्याचे सांगितलं.