(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोंबिवली स्फोटात 6 जणांचा होरफळून मृत्यू, भीषण दुर्घटनेनं परिसरात धावपळ, कामगार कुटुंबात हळहळ
डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आलं आहे. मात्र, येथील भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मुंबई : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाच्या (Dombivali blast) भीषण आवाजानंतर काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ परिसरात पसरले होते. डोंबिवलीतील या भीषण स्फोट दुर्घटनेत 4 ते 6 कामगारांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार करण्यात येत आहे. मात्र, सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेही घटनास्थळी पोहोचले होते.
डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आलं आहे. मात्र, येथील भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडथळा येत होता. आगीची तीव्रता भीषण व धुराचे लोळ परिसरात पसरत असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवताना कसरत करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीन तासानंतरही हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
3 ते 4 किमीपर्यंत स्फोटाचा आवाज
स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत.
उपचाराचा खर्च सरकार करणार
मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली MIDC येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
9 वर्षांपूर्वीच्या स्फोटाची आठवण
26 मे 2016 रोजी एमआयडीसी फेज 2 मधील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. या घटनेची तीव्रता अधिक असल्याने कंपनीत काम करणाऱ्या 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या 215 जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यावेळी, कल्याण तहसील दाराकडून 2660 नुसार बाधितांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. पंचनामे झालेल्या मालमत्तेचा आकडा साधारणपणे 7 कोटी 43 लाख सत्तर हजार रुपयांपर्यंतचा होता.
फडणवीसांची अधिकाऱ्यांशी चर्चा
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी म्हटले.