Crime News : वेतनवाढ रोखल्याचा राग; वरिष्ठाला संपवून हवालदाराने केला पोबारा, पण...
Crime News : वेतनवाढ रोखल्याचा रागातून एका हवालदाराने रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकाची हत्या केली. कल्याण पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केली.
Thane Crime News : वेतनवाढ रोखल्याच्या वादातून रेल्वे सुरक्षा दलातील (Railway Protection Force ) पोलीस उपनिरीक्षकाची हत्या रेल्वे सुरक्षा दलातील हवालदारानेच केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्व भागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कर्मचारी निवास वसाहतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा (Crime) दाखल करून हत्या करून पळालेल्या आरोपी हवालदाराच्या पेणमधून काही तासातच मुसक्या आवळल्या आहेत. पंकज यादव (35) असे अटक हवालदार आरोपीचे नाव आहे. तर बसवराज गर्ग (56) असे हत्या झालेल्या रेल्वे सुरक्षा दलातील उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मृतक बसवराज गर्ग हे अंबरनाथ रेल्वे स्थानक विभागात कार्यरत होते. तर आरोपी हवालदार पंकज यादव हा रेल्वे सुरक्षा दलात रोहा रेल्वे स्थानक विभागात कार्यरत आहे. त्यातच दोघेही कल्याण रेल्वे सुरक्षा दलात 2019 साली कार्यरत असताना मृत बसवराज गर्ग यांनी आरोपी हवालदाराच्या वेतनवाढीच्या तीन वर्षाबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. त्यामुळे आरोपीची वेतनवाढ थांबवण्यात आली होती. तेव्हापासूनच आरोपी यादव हा गर्ग यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या आणखी तिघांच्या हत्येचा कट रचून होता, अशी माहिती समोर आली आहे.
बुधवारी (8 फेब्रुवारी 2023) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उपनिरीक्षक गर्ग हे आपल्या रेल्वे वसाहत मधील निवासातील घरातील खोलीत बिछान्यावर पडून मोबाईल मधील गाणी ऐकत होते. तर त्यांचा एक सहकारी उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी हे घराच्या बाहेर येऊन धुतलेले कपडे दोरीवर वाळत घालत होते. तेवढयात त्रिपाठी यांना दूरवरुन अंधारातून एक इसम आपल्या खोलीत गेला असल्याचे जाणवले. धुलाई यंत्र सुरू असल्याने मोठा आवाज परिसरात सुरू होता. खोलीतून ओरडल्याचा आवाज आल्याने उपनिरीक्षक त्रिपाठी हातचे काम टाकून पळत खोलीत गेले. त्यांना बसवराज गर्ग पलंगावरुन खाली पडल्याचे दिसले. एक इसम पलंगाला मच्छरदाणीसाठी लावलेली लोखंडी सळई काढत होता. पलंगाच्या बाजुला उशी, चादर, लाकडी दांडके पडले होते. हा प्रकार पाहताच त्रिपाठी यांनी बाहेर येऊन आपल्या सहकाऱ्यांना ओरडून आवाज दिला. त्यावेळी एस. एस. शेटे, संतोष पटेल, मंगेश उमाशंकर कुर्मी हे तेथे धावत आले.
लाकडी दांडक्याने हत्या
तोपर्यंत हल्लेखोर हवालदार घटनास्थळावरून पळून गेला. मात्र हल्लेखोरला पळून जाताना इतर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिले होते. उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी पळून गेलेला इसम कोण अशी विचारणा सहकाऱ्यांना केली. त्यांनी तो रेल्वे सुरक्षा बळातील हवालदार पंकज यादव आहे असे सांगितले. बसवराज गर्ग यांच्यावर हल्लेखोराने लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने रक्ताच्या थारोळ्यात घरातच जमिनीवर पडले होते. त्यानंतर सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांनी बसवराज यांना गंभीर अवस्थेत तात्काळ कल्याण मधील रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काही तासातच अटक
दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस उपनिरीक्षक त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला असता, आरोपी हवालदार हा चिपळूणच्या दिशेने गेल्याची खबर शोध पथकाला लागली होती. त्यामुळे शोधपथक चिपळूणला रवाना होताच आरोपी हा पेण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रेल्वेच्या बॅरेकमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे वेतनवाढ रोखण्यासाठी आणखी तिघांनी मदत केल्याचा राग आरोपी हवालदाराच्या मनात होता. त्यामुळे बसवराज गर्ग यांच्या हत्येनंतर तो त्या तिघांचीही हत्या करण्याच्या तयारीत होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :