(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Loksabha : सीएम एकनाथ शिंदे ठाणे बालेकिल्ल्यात 'या' तीन उमेदवारांसाठी आग्रही; भाजपकडून 'या' नावाचा प्रस्ताव!
Thane Loksabha : कल्याण आणि ठाणे या दोन जागांसाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा या दोन्ही जागांसाठी पणाला लावली आहे.
Thane Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांची उमेदवारीच अडचणीत आल्याने एकनाथ शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. इतकंच नव्हे, तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर करूनही शिंदे यांना उमेदवारी कापावी लागल्याने एक प्रकारे नाराजी पसरली आहे. ही नाराजी एका बाजूने असतानाच यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा भावना गवळी (Bhawnav Gawali) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. याठिकाणी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील (Rajshri Patil) हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या दोन जागांवरून घामासन सुरू असताना अजूनही चार जागांमध्ये महायुतीमध्ये पेचप्रसंग कायम आहे. त्यामुळे हा दावा सुटणार तरी कधी? यावरती लक्ष लागून राहिलं आहे.
कल्याण आणि ठाणे या दोन जागांसाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा या दोन्ही जागांसाठी पणाला लावली आहे. कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असून सुद्धा त्यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आता त्यांनाच उमेदवारी मिळणार की हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला जाणार? याची चर्चा आहे.
ठाण्यात शिंदेंकडून तीन नावांची चर्चा
दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा भाजपने दावा केल्याने ठाणे द्यायचं की कल्याण द्यायचं असाच प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. भाजपने शिंदेंकडे असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या इलेक्टिव्ह मेरीटवर विरोध केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची चांगलीच गोची झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषदेचे रवींद्र फाटक यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र या तिन्ही नावांना भाजपने विरोध केला आहे. बदल्यात भाजपकडून डॉ. संजीव नाईक यांच्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये तिढा कायम
या दोन मतदारसंघावरून पेच कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. या मतदारसंघावर नारायण राणे यांनी थेट दावा केला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी मतदारसंघावर दावा केला कायम आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये सुद्धा स्थिती फारशी वेगळी नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याकडे सुद्धा लक्ष आहे. हा मतदारसंघ शिंदे यांना घेता आला नाही तर कोकणामध्ये जी शिवसेना वाढली, विस्तारली तिथं धनुष्यबाण चिन्ह लोकसभा निवडणुकीमध्ये नसेल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजी नगर मतदारसंघ एकनाथ शिंदे गटासाठी सोडला जाऊ शकतो, तर नाशिकमध्ये सुद्धा हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी नाशिक दौऱ्यामध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर अजित पवार गटाकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला असून छगन भुजबळ यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या