(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi : भिवंडीत पुन्हा खड्ड्याने घेतला दुचाकी चालकाचा बळी; बळी संख्या चारवर
या अपघाताच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातारण पसरले असून त्यांनी खड्डे दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भिवंडी: शहरातील भिवंडी-वाडा महामार्गावरील कामवारी नदीच्या पुलावरील एका खड्ड्यात दुचाकी आदळून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यत चार नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. अशोक काबाडी (वय 65 रा. कवाड, ता. भिवंडी ) असे खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
भिवंडी - वाडा महामार्गासह कामवारी नदीच्या पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे. अशातच कवाड गावात रहाणारे अशोक काबाडी हे त्यांची मुलगी आदिती (वय 25) असे दोघे कवाडहून भिवंडीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. याच सुमाराला कामवारी नदीच्या पुलावरील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळल्याने ते खाली पडले. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अशोक काबाडी यांच्या पोट आणि छातीवरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी आदिती हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपुरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघाताच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातारण पसरले असून त्यांनी खड्डे दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून खड्डे दुरुस्तीचे निवदेन देऊन मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण व शहरी भागातील खंड्याची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासन आणखी किती नागरिकाचे बळी घेतल्यानंतर खड्डे दुरुस्ती करणार असा संतप्त सवाल नागरिक करीत असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंकडे एका बस चालकाने खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताची समस्या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली होती. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होती. या व्हिडीओमध्ये बस चालक म्हणतो कि, शिंदे साहेब अख्खी भिवंडी खड्यात गेली हो, जर लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब.
मात्र त्याचा आजपर्यत काहीच परिमाण झाला नसल्याचं दिसून येत आहे. आजही भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत.