स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्त्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर युनिट उपलब्ध देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
ठाणे : मागील दोन वर्षांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 92 हजार कोटींची विकास कामे करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ते डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना देण्यात आलेल्या मोफत सोलर पॉवर युनिट कार्यक्रमात बोलत होते. राज्यात गेल्या महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडात विविध रस्ते, पूल, इमारती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या विकासकामांच्या माध्यमातून तब्बल 92 हजार कोटींची कामे केल्याचा दावा मंत्री चव्हाण यांनी केला.
केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्त्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर युनिट उपलब्ध देण्याचा प्रयत्न चालवला आहे. हजारो सोसायट्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असून या माध्यमातून सोलर एनर्जीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होणार आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक सोसायट्या जोडल्या गेल्या आहेत. आजपर्यंत एकूण 268 गृहसंकुल लाभार्थी झाले आहेत. यामधील 14 गृहसंकुलाना आज सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या हस्ते सोलर पॅनल वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन करताना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावागावाचे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहे. त्यामुळे या गावांना प्रथमच चांगल्या रस्त्यावरून प्रवास करणे शक्य झाले, असे नमूद करतानाच स्वातंत्र्यानंतर प्रथमच दोन वर्षांच्या काळात 92 हजार कोटींची विकासकामे आपल्या खात्याच्या माध्यमातून करण्यात आपण यशस्वी झाल्याचेही चव्हाण यांनी सांगितलं
हेही वाचा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप