(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पब्जीसाठी मुलाने आई-वडिलांचे 16 लाख रुपये उडवले!
तरुणाईला पब्जी गेमचं अक्षरश: व्यसन लागलं आहे. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केले.
(खरड) पंजाब : तरुणाईला पब्जी गेमचं अक्षरश: व्यसन लागलं आहे. पब्जी गेमची क्रेझ किती महागात पडू शकते याचं उत्तम उदाहरणमध्ये पंजाबमध्ये घडलेली घटना. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केले. खरड भागात राहणाऱ्या या मुलाने गेमच्या व्यसनापोटी आपल्या आई-वडिलांची संपूर्ण वैद्यकीय गरजेसाठी केलेली बचत वाया घालवली.
या मुलाकडे तीन बँक खात्यांची माहिती होती, त्याचा वापर तो पब्जी मोबाईल अकाऊंट अपग्रेड करण्यासाठी करत असेल. एवढंच नाही तर आपल्या मित्रांसाठीही अॅप विकत घ्यायचा आणि अपग्रेड करायचा. आई-वडिलांना बँक व्यवहाराची माहिती मिळल्यानंतर दिवट्याचा पराक्रम उघड झाला.
या मुलाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. "मी हे पैसे वैद्यकीय गरज आणि मुलाच्या भविष्यासाठी बचत केले होते," असं वडिलांनी सांगितलं. "लॉकडाऊनदरम्यान मी माझ्या कामाच्या ठिकाणीच राहत होता तर माझी पत्नी आणि मुलगा घरात राहायचे. मुलगा त्याच्या आईच्या मोबाईलमधूनच सर्व व्यवहार करत असे. तसंच बँकेचे सर्व मेसेज डिलीट करत असे," अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली.
आपला मुलगा ऑनलाईन अभ्यासासाठी स्मार्टफोनचा जास्त वापर करत असल्याचा आई-वडिलांचा गोड गैरसमज होता. परंतु मुलाने गेमसाठी चक्क 16 लाख रुपये वाया घालवल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
"मी त्याला घरात रिकामा बसू देणार नाही, इतकंच काय तर त्याला अभ्यासासाठीही मोबाईल फोन देणार नाही," अशी उद्विग्न प्रतिक्रिया वडिलांनी दिली. मोबाईलवर पब्जी गेम खेळू नये यासाठी त्याला स्कूटर रिपेअरिंग शॉपमध्ये काम करण्यास ठेवलं आहे, जेणेकरुन पैसे कमावणं किती कठीण आहे हे त्याला कळू शकेल," असंही ते म्हणाले.
खरंतर तरुणाईमधील पब्जी गेमचं वाढतं व्यसन लक्षात घेऊन याआधीही या गेमवर बंदी घालण्याची मागणी वारंवार केली जात होती. चीनसोबतच्या तणावानंतर मोदी सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. आता पब्जी गेमवरही बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.