(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गूगल प्ले स्टोअरवरून Paytm अॅप हटवलं, 'हे' आहे कारण...
स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना परवानगी देत नाही आणि असे अॅप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढले जातील, असं गूगलने म्हटलं आहे.
मुंबई : गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आला आहे. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना परवानगी देत नाही आणि असे अॅप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढले जातील, असं गूगलने म्हटलं आहे.
गूगलच्या निर्णयानंतर पेटीएमने ट्वीट केले की, “गुगलच्या प्ले स्टोअरवर Paytm Android App नवीन डाऊनलोड्स किंवा अपडेटसाठी तात्पुरते उपलब्ध नाही. लवकरच ते पुन्हा उपलब्ध केले जाईल. आपले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे पेटीएम अॅप सुरू ठेऊ शकता.
Dear Paytm'ers,
Paytm Android app is temporarily unavailable on Google's Play Store for new downloads or updates. It will be back very soon. All your money is completely safe, and you can continue to enjoy your Paytm app as normal. — Paytm (@Paytm) September 18, 2020
गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, "आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही किंवा क्रीडा सट्टेबाजीला सुलभ करू शकणार्या कोणत्याही अनियमित अॅपला मान्यता देत नाही. यामध्ये ते अॅप्स समाविष्ट आहेत जे ग्राहकांना बाह्य वेबसाईटला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतात. जे पैसे घेऊन खेळात पैसे किंवा रोख बक्षिसे मिळविण्याची संधी देतात, हे आमच्या धोरणांचे उल्लंघन आहे."
भारतात आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धा सुरु होण्याआधी असे अॅप्स मोठ्या प्रमाणात लान्च केले जातात. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) तेरावा सीजन युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गूगलने हे मोठं पाऊल उचललं आहे.