इन्स्टाग्राम शॉपिंग अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत
इन्स्टाग्राम लवकरत आपलं शॉपिंग अॅप आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी इन्स्टाग्राम आयओएस आणि अॅन्ड्रॉईड प्लॅटफॉर्मसाठी वेगळं अॅप तयार करत आहे.
नवी दिल्ली : इन्स्टाग्राम लवकरच आपलं शॉपिंग अॅप आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी इन्स्टाग्राम आयओएस आणि अॅन्ड्रॉईड प्लॅटफॉर्मसाठी वेगळं अॅप तयार करत आहे. इन्स्टाग्रामचं हे नवं अॅप प्रामुख्याने ई-कॉमर्ससाठी असणार आहे. या नव्या अॅपचं नाव आयजी शॉपिंग (IG Shopping) असेल असंही बोललं जात आहे.
इन्स्टाग्रामचं हे नवं अॅप इन्स्टाग्राम अकाऊंटशी लिंक असणार आहे. याद्वारे यूजर इन्स्टाग्रामवरून शॉपिंग अॅपपर्यंत पोहोचणार आहे. इन्स्टाग्रामने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे हे अॅप कधीपर्यंत लॉन्च होणार याबाबतही काही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
इन्स्टाग्रामने याआधी यूट्युबला टक्कर देण्यासाठी आयजीटीव्ही (IGTV) हे अॅप लॉन्च केलं होतं. या अॅपमध्ये एक तासापर्यंत लाईव्ह स्ट्रिमिंग करता येते. तसेच लाईव्ह स्ट्रिमिंग शेअर करण्याचा पर्यायही यामध्ये आहे. 'द वर्ज'च्या रिपोर्टनुसार इन्स्टाग्राम या नव्या अॅपवर काम करत आहे. ई-कॉमर्स सेक्टरमध्ये आपला विस्तार करण्यासाठी बाजारातील स्थितीबाबत कंपनी आढावा घेत आहे.
या नव्या अॅपमध्ये यूजर्सना आपल्या आवडत्या ब्रॅन्डच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हे अॅप लॉन्च झाल्यास इन्स्टाग्रामच्या आर्थिक स्थितीत वाढ होणार असल्याचंही 'द वर्ज'च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
व्यापाऱ्यांना आकर्षिक करण्यासाठी आपल्या अॅपमध्ये नवीन टूल्स तयार करण्यासाठी इन्स्टाग्राम प्रयत्नशील आहे. सध्या इन्स्टाग्राम कंपन्यांना आपल्या प्रोडक्टच्या फोटोला टॅग करण्याचा ऑप्शन देत आहे. यूजरने फोटोवर क्लिक केल्यानंतर ते प्रोडक्ट खरेदी करता येतं.