एक्स्प्लोर
'चांद्रयान-2' चं काऊंटडाऊन सुरु, 9 ते 16 जुलै दरम्यान प्रक्षेपण होणार!
चांद्रयान-2 चे प्रामुख्याने तीन भाग आहेत, ज्यात ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोवरचा समावेश आहे. ऑर्बिटर आणि लॅण्डर जीएसएलव्हीला जोडलेले असतील. तर रोवर लॅण्डरच्या आत लावला आहे.

बंगळुरु : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम लवकरच सुरु होणार आहे. चांद्रयान-2 चं प्रक्षेपण 9 आणि 16 जुलैच्या दरम्यान होईल. इस्रोने बुधवारी (1 मे) ही घोषणा केली. जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटामधून चांद्रयान-2 चं प्रक्षेपण होईल. 6 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान-2 चंद्रावर पाऊल ठेवेल, असा अंदाज आहे. आतापर्यंत चार वेळा चांद्रयान-2 चं प्रक्षेपण टळलं आहे. चांद्रयान-2 चे प्रामुख्याने तीन भाग आहेत, ज्यात ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोवरचा समावेश आहे. ऑर्बिटर आणि लॅण्डर जीएसएलव्हीला जोडलेले असतील. तर रोवर लॅण्डरच्या आत लावला आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर जेव्हा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लॅण्डर त्याच्यापासून वेगळा होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील निर्धारित स्थानावर पोहोचेल. यानंतर रोवर यामधून बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तिथले नमुने एकत्र करेल आणि त्याची माहिती इस्रोला पाठवेल. ही सगळी प्रक्रिया 6 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा इस्रोचा अंदाज आहे. याआधी काही चाचण्या पूर्ण न झाल्याने इस्रोने चांद्रयान-2 लॉन्च केलं नव्हतं. भारताच्या पहिल्या चांद्रयानसोबत रोवर आणि लॅण्डर नव्हता. यंदा रोवर आणि लॅण्डरही चांद्रयान-2चा भाग आहे. इस्रोने चांद्रयान-2 याआधी 2017 आणि मग 2018 मध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली होती, पण ते शक्य झालं नाही. यापूर्वी 25 ते 30 एप्रिलच्या दरम्यान चांद्रयान-2 चं प्रक्षेपण होणार होतं. चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये - चांद्रयान-2 चं वजन 3290 किलो असेल. - चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळा होईल. - यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि मग रोवर त्यापासून वेगळा होईल. - ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आणि सेंसर असतील. - तर रोवरमध्येही अत्याधुनिक उपकरणं असतील. - हे दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांची माहिती पाठवतील. - त्या माहितीच्या आधारावर इस्रो त्यावर अभ्यास करेल. दक्षिण ध्रुवावर लॅण्डिंग इस्रो लॅण्डरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार आहे. यासाठी दोन जागांची निवड करण्यात आली असून लवकरच एक जागा निश्चित केली जाईल. या दोन्ही जागांवर कोणत्याही देशाचा लॅण्डर उतरलेला नाही. इस्रोच्या माहितीनुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील जमीन मऊ आहे आणि रोवर हलवण्यासाठी इथे कोणतीही अडचण येणार नाही. रोवरला सहा पाय असून त्याचं वजन 20 किलो आहे. रोवरला ऊर्जेची अडचण भासू नये, यासाठी त्यात सोलर पॉवर असलेली उपकरणंही आहेत. यामुळे पृथ्वीवरुन रोवरचं योग्य अंतर समजण्यास सोपं पडेल. याआधी 2008 मध्ये चंद्रयान-1 लॉन्च केलं होतं. पण इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने ही मोहीम 29 ऑगस्ट 2009 रोजीच संपुष्टात आली होती.
आणखी वाचा























