(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता, रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद यांचं नाव जवळपास निश्चित
रेणू देवी चौथ्यांदा बेतियाहमधून आमदार निवडून आल्या आहेत. तर कटिहार येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
पटना : बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. भाजपच्या रेणू देवी यांच्यासह तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तारकिशोर प्रसाद यांना भाजप विधानसभेचे नेते म्हणून निवडले गेले आहे. ते कटिहार येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर रेणू देवी चौथ्यांदा बेतियाहमधून आमदार निवडून आल्या आहेत.
सुशील मोदींकडून तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवींचं अभिनंदन
तारकिशोर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झाल्यानंतर सुशील मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सुशील मोदी यांनी ट्वीट केले की, "तारकिशोरजी यांना एकमताने भाजपा विधिमंडळाचा नेता निवडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन."
तारकिशोरजी को भाजपा विधानमंडल का नेता सर्वसम्मति से चुने जाने पर कोटिशः बधाई !
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020
दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "नोनिया समुदायातून आलेल्या बेतिया येथून चौथ्यांदा निवडून आलेल्या रेणू देवी यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या उपनेतेपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!"
नोनिया समाज से आने वाली बेतिया से चौथी बार विधायक श्रीमति रेणु देवी के भाजपा विधान मण्डल दल के उप नेता सर्वसम्मति से चुने जाने पर हार्दिक बधाई!
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020
राज्यपालांना भेटून आल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा नव्हती. परतु भाजप नेत्यांच्या आग्रहाखातर हे पद स्वीकारण्यास तयार झालो आहे. मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशीच माझी इच्छा होती."
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश यांच्यासोबत हम पक्षाचे अध्यक्ष जितनराम मांझी, व्हिआयपी पक्षाचे मुकेश सहनी हे नेतेही राज्यपालाच्या भेटीवेळी उपस्थित होते. उद्या म्हणजे सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. नितीश कुमार बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असले तरी त्यासाठी अजून कुणाचेही नाव जाहीर करण्यात आले नाही.
संबंधित बातम्या: