एक्स्प्लोर
सत्ताधाऱ्यांच्या संमतीनंच इतिहासाचा खेळखंडोबा? भाजपकडून तक्रार का नाही, माझा विशेषच्या चर्चेतला सूर
तान्हाजी सिनेमातील दृश्यांना मॉर्फ करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. या व्हीडिओवरुन महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याच विषयाला घेऊन आज एबीपी माझाच्या 'माझा विशेष' या कार्यक्रमात 'चुकीचा इतिहास, यांचा आणि त्यांचा!' याखाली सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत नेमकं काय घडलं जाणून घ्या...
मुंबई : आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद शमत नाही तोच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओवरुन नवा राजकीय वाद पेटला आहे. तान्हाजी सिनेमातील दृश्यांना मॉर्फ करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. तसंच अरविंद केजरीवाल यांची उदयभानशी तुलना करण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या व्हीडिओवरुन महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या संपूर्ण वादानंतर अखेर पॉलिटिकल किडाने वादग्रस्त व्हीडिओ यू-ट्यूबवरुन काढून टाकला.या प्रकरणी आज राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच विषयाला घेऊन आज एबीपी माझाच्या 'माझा विशेष' या कार्यक्रमात 'चुकीचा इतिहास, यांचा आणि त्यांचा!' याखाली सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, कोलाजचे संपादक सचिन परब, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजप आमदार राम कदम, आनंद दवे, विश्लेषक विश्वंभर चौधरी, इतिहास संशोधक पांडुरंग बनखवडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
शिवसेनेचे नेते काहीही माहिती न घेता भाजपवर टीका करतात : राम कदम
यावेळी भाजपची या संदर्भात भूमिका राम कदम यांना विचारण्यात आली. त्यावर कदम म्हणाले की, ट्विटरवर कुठल्यातरी एका अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला. याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. छत्रपती शिवरायांशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. आम्ही दिल्लीच्या निवडणुकीत या व्हिडिओचा वापर केलेला नाही. आमचा काहीही संबंध नसताना शिवसेनेचे नेते संजय राऊत काहीही माहिती न घेता भाजपवर टीका करतात. अर्धवट माहितीच्या आधारे टीका करणे शिवसेनेच्या नेत्यांनी टाळावे. त्यांना बोलायचं असेल तर जितेंद्र आव्हाडांनी समस्त हिंदूंचा अपमान केला त्यावेळी बोलले नाहीत. अशोक चव्हाण यांनी सांगितलं की मुस्लिम बांधवानी सांगितलं म्हणून आम्ही सत्ता स्थापन केली. हिंदुत्वाचा जप करणारी शिवसेना यावेळी गप्प का? सावरकरांचा अपमान केल्यावर देखील शिवसेना गप्प का? असा सवाल राम कदम यांनी केला. केवळ राजकरण करायचं म्हणून अर्धवट ज्ञानाच्या बळावर आरोप करणे चुकीचं आहे असा आरोप त्यांनी केला.
खोट्या असल्या तरी इमेज आणायच्या हे आता शास्त्र झालं : विश्वंभर चौधरी
चुकीचा इतिहास दाखवून, प्रतिमांमध्ये फेरफार करून नवे नायक तयार करण्याचं राजकारण काय आहे? यावर बोलताना विश्लेषक विश्वंभर चौधरी म्हणाले की, हे राजकारण अमेरिकेच्या निवडणुका झाल्या तेंव्हापासून पाहत आहोत. इमेजेसचा वापर लोकांसमोर करत राहायचा त्या इमेजेस लोकांच्या मनात फिट करत राहायच्या, खोट्या असल्या तरी इमेज आणायच्या आणि तशा प्रकारची मानसिकता बनवायची. हे आता शास्त्र झालं आहे, असा उपरोधिक टोला चौधरी यांनी लगावला. या प्रकारामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची इज्जत जाणार आहे. तर या प्रकरणी भाजपने कुठे तक्रार केली आहे का? त्यांच्या प्रतिमा वापरल्या आहेत तर ते बदनामी कारक आहे. दिल्लीत यांची अनेक वर्ष सत्ता होती, त्यावेळी यांनी काहीही केलं नाही. भाजपने काय केलं यावर बोललं पाहिजे. मात्र हे चुकीचं आहे. भाजपने गुन्हा दाखल करायला हवा, असे ते म्हणाले. तान्हाजीचा इतिहास कळून घेण्यासाठी सिनेमाची गरज नाही. याला एक सिनेमा म्हणून सोडावे. चित्रपट हा इतिहास नसतो. मात्र याचा राजकीय वापर नको, असे चौधरी म्हणाले.
तुम्ही तक्रार करत नसाल तर मूकसंमती आहे का? अभय देशपांडे
यावर अभय देशपांडे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात कुठल्याही जाहिराती करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. चौधरी म्हणाले ते बरोबर आहे. त्रयस्थ व्यक्ती तुमच्या नेत्यांच्या प्रतिमा वापरता असतील तर तुम्ही तक्रार करायला हवी. तुम्ही त्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेवर टीका करत आहात. मात्र जो पोलिटिकल किडा हे उद्योग करतोय त्यावर तुम्ही काय कारवाई केली. जर तुम्ही तक्रार करत नसाल तर तुमची याला मूकसंमती आहे का? असा सवाल देशपांडे यांनी केला. हा हिंदू नरेटिव्ह नाही. प्रोपगेंडा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा कसा वापर होतो हे विधानसभा निवडणुकीमध्ये दिसले. अनेक मालिकांमध्ये प्रचार करण्यात आला. याची तक्रार काँग्रेसने केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने नोटीसही काढली होती, असे अभय देशपांडे म्हणाले.
यावर सचिन परब म्हणाले की, यात चार गोष्टी एकत्र आल्या आहेत. सिनेमा, राजकारण, धर्म आणि इंटरनेट याचा यात समावेश आहे. हे सगळे कम्पोनंट एकत्र आले आहेत, हे सगळं स्फोटक आहे. पाचही गोष्टींचा एकत्र संबंध येणं घातक आहे. ही गोष्ट सोडून देण्यासारखी नाही.
अतुल लोंढे यावर म्हणाले की, 2014 पासून या गोष्टीचा सिक्वेन्स बघितला पाहिजे. धर्माच्या न्यायावर भाजपला राजकारण न्यायचं होतं हे त्यावेळचं समोर आलं होतं. हिंदुराष्ट्राचे स्वप्न पूर्ण झालं असं त्यावेळी भाजप नेत्यांनी म्हटलं होतं. सैफ अली खानने काय म्हटलं यावर चर्चा होऊ शकते. मात्र तो म्हणतो म्हणून चूक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. धर्माकडे कल घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय.
डीओच्या मागे भाजपचं , भाजपनं याबाबत तक्रार करावी : आनंद दवे
राम कदमांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत शिवसेनेचे आनंद दवे म्हणाले की, भाजप कार्यालयामध्ये वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि पुन्हा पुस्तक मागे घेण्याची घोषणा केली. या व्हिडीओत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची ओरिजिनल वक्तव्य देखील दाखवली आहेत. या व्हिडीओच्या मागे भाजपचं आहे. भाजपनं याबाबत तक्रार करावी आम्ही त्यांच्यासोबत झाली.
यावर राम कदम म्हणाले की, किती दुर्दैवी आहे पहा. युगांत या संजय राऊत यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी करत आहेत. आव्हाडांविषयी शिवसेना गप्प का आहे. दिल्लीतील पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही. भाजपचे 11 कोटी कार्यकर्ते आहेत. भाजपने ते पुस्तक मागे घ्यायला लावलं. महाराष्ट्रात यांचं सरकार आहे, यांनी चौकशी करावी. तुमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, चौकशी करा. शिवरायांच्या वंशजांचा अपमान होताना हे गप्प बसतात. इंदिराजींबद्दलच वक्तव्य शिवसेना मागे घेते मात्र शिवरायांबद्दलच नाही. बाळासाहेब ठाकरेंना याबाबत काय वाटलं असतं, त्यांनी सत्तेला लाथ मारली असती असं ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना आज राहिली नाही, असे ते म्हणाले.
यावर आनंद दवे यांनी कदमांवर टीका करत म्हणाले की, राम कदम इतिहास विसरत आहेत. अतिरेक्यांना नेपाळ, अफगाणिस्तानमध्ये पैसे देऊन सोडणारे यांचेच जसवंत सिंग होते. पीडीपीबरोबर सरकार स्थापन करणारे भाजप, शिवरांच्या पुण्यतिथीला ढोल बडवणारे हेच होते. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, ते आम्ही विसरणार नाहीत. काही गोष्टीत भाजपने जशी पीडीपीबरोबर तडजोड केली तशी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर केली आहे, असे दवे म्हणाले. सावरकरांवरील भूमिका देखील आम्ही स्पष्ट केली आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीमध्ये स्थानीय इतिहासाचं खच्चीकरण करणारी लॉबी : नीलम गोऱ्हे
दोन हिंदुत्ववादी दुकानदार एकमेकांसमोर भांडत असल्याचे दिसत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचे आभार मानायला हवेत, असे शेवटी विश्वंभर चौधरी म्हणाले. शेवटी चर्चेत सहभागी झालेल्या नीलम गोऱ्हे यावर म्हणाल्या की, समाजमाध्यमांवर आमचा काही संबंध नाही असे अकाउंट चालवले जात आहेत. यामागे कुठली शक्ति आहे याचा शोध घ्यावा लागेल. स्थानीय इतिहासाचं खच्चीकरण करणारी लॉबी दिल्लीमध्ये आहे. या व्हिडिओमागे कुणीतरी सूत्रधार आहे. भाजपने या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता. वादंग झालं की प्रसिद्धी मिळते ही एक स्टेटर्जी आहे.
काय आहे या चर्चेचा सारांश
इतिहास म्हणजे काय? याच्या अनेक व्याख्या आहेत. जेते सांगतात तो इतिहास असंही म्हटलं जातं. गेल्या काही काळात म्हणजे पद्मावत, बाजीराव मस्तानी, पानिपत ते आता तान्हाजीपर्यंत इतिहासाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन दिसून येतो. म्हणूनच, सैफ अली खान जेव्हा म्हणतो की तान्हाजीमध्ये दाखवलेला इतिहास योग्य नाही आणि पुढे तो असंही म्हणतो की देशात जे काही चालू आहे ते 'डेंजरस' आहे, तेव्हा सैफच्या बोलण्यापलिकडे तो काय सांगू पाहतोय हे महत्वाचं ठरतं. दुसरीकडे, तान्हाजी फिल्मच्या ट्रेलरचा वापर करून मोदी आणि शाहांचा प्रचार केला जातो. केंद्रीय गृहखातं ज्यांच्या ताब्यात आहे, ते अशा वेबसाईटमागील लोकांना मात्र पकडत नाहीत. हे सगळंच बुचकळ्यात पाडणारं. त्याआधी मोदींची शिवरायांशी तुलना करणारं पुस्तकही येऊन गेलेलं असतं. म्हणजे, आधीच हवातसा घडवलेला इतिहास दाखवायचा आणि शिवाय त्यावरूनही अजेंडा रेटायचा! या घटनांची नोंद हाही एक इतिहासच असेल मात्र, त्याला शिवरायांच्या इतिहासाची सर कधीच येणार नाही.
संबंधित बातम्या
तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल
Tanhaji Spoof Video | छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेचं समर्थन नाही, वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी भाजपच्या राम कदमांची प्रतिक्रिया
Tanhaji Political Spoof | तान्हाजीच्या पॉलिटिकल व्हिडीओमुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक, व्यक्तिरेखांना मोदी, शाहांचे चेहरे लावल्याने वाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement