तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल
दिल्ली विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजलं आहे. दिल्ली काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल किडा या ट्विटर हॅन्डलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या तानाजी चित्रपटातील दृष्यांचा वापर केला आहे. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिल्ली निवडणूकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. दिल्ली काबीज करण्यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच अनेकांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. अशातच पॉलिटिकल किडा या ट्विटर हॅन्डलवरून 'Delhi Election 2020 ft. Shah-ji' असं कॅप्शन देत एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरणारा अभिनेता शरद केळकर याच्या चेहऱ्याच्या जागी नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणच्या चेहऱ्याच्या जागी अमित शहा यांचा चेहरा एडिट करण्यात आला आहे. एवढचं नाहीतर उदयभान राठोडची भूमिका साकरणाऱ्या सैफ अली खानच्या चेहऱ्याच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा एडिट करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा नवा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Delhi Election 2020 ft. Shah-ji pic.twitter.com/I1WFf3lYnL
— Political Kida (@PoliticalKida) January 19, 2020
शिवरायांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत
दिल्ली विधानसभा निवडणूकांच्या पाश्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा शिवरायांचा अपमान असल्याचे म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फ करुन त्याचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा तर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. शिवरायांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे. तसेच शिवरायांचा वापर राजकारणासाठी होऊ नये असंही राऊत म्हणाले आहेत. याप्रकरणी सांगली, सातारा बंद पुकारणारे काय भूमिका घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये : छत्रपती संभाजी राजे
तानाजी चित्रपटातील दृश्यांवर मॉर्फिंग करून करण्यात आलेल्या व्हिडीओबाबत छत्रपती संभाजी राजेंनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात दोन ट्वीट केले आहेत. एका ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, 'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.' तसेच आणखी एक ट्वीट करत, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, असं सांगितलं आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, 'आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.'
दरम्यान, गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलं होतं. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाद्वारे मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. तसेच देशभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुस्तकाच्या लेखकांनी हे पुस्तक मागे घेतलं होतं आणि या वादावर पडदा पडला होता.
संबंधित बातमी :
Delhi Election : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, केजरीवाल नवी दिल्ली मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार
मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचं भाजप कार्यालयात प्रकाशन, शिवभक्तांमध्ये रोष
छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबत तातडीनं सुनावणीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात