(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मृत्यूशी 'दोन' हात करून डॉ. मेहता सुखरूप घरी!
कोरोनाबाधित डॉ. मेहता 96 दिवस रुग्णालयात राहून सुरतमध्ये शनिवारी परतणार, डॉ. मेहता यांनी स्वतः ऑक्सिजनवर उपचार घेत असताना दुसऱ्या रुग्णाला वाचवण्यासाठी स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढून त्यांच्यावर उपचार केल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तब्बल 96 दिवस रुग्णालयात वास्तव्य करून सुरत येथील 37 वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ. संकेत मेहता चेन्नई वरून लवकरच आपल्या घरी परतणार आहेत. डॉ. मेहता स्वतः ऑक्सिजन वर अतिदक्षता विभागात उपचार असताना, अचानकपणे 71 वर्षांचे गृहस्थ आयसीयूमध्ये दाखल झाले आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरता व्हेंटिलेटर ठेवणं गरजेचं होतं, त्यासाठी उपचाराचा भाग म्हणून ट्यूब टाकणं गरजेचं होतं. मात्र, डॉक्टर येण्यास उशीर होत असल्याचे समजताच डॉ. मेहता यांनी स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढून बाजूला ठेवत, स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता या रुग्णामध्ये ट्यूब टाकण्याचे काम केले. मात्र, डॉक्टरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्व स्तरातून कौतुक झाले असले तरी 20-25 मिनिटे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांवर भयंकर परिणाम झाला असून त्यांना 'फुफ्फुसांचे प्रत्यारोपण' करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या करिता त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रत्यारोपण न करता बरे करण्यात चेन्नईच्या डॉक्टरांना यश आले असून ते शनिवारी 31 जुलैला रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन सुरतला येणार आहेत.
13 सप्टेंबरला डॉ. मेहता यांना पुढच्या उपचारासाठी, एअर अॅम्ब्युलन्सने चेन्नई येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. या उपचारासाठी तब्बल एक कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्याची जुळवाजुळव करण्यासाठी सुरत येथील इतर डॉक्टर सहकाऱ्यांनी मदतनिधी (क्राऊडफंडिंग) गोळा करण्यास सुरुवात केली होती, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन या सहकाऱ्यांनी केलं होते.
डॉ. मेहता यांना रुग्णांवर उपचार करत असताना 28 जुलै रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्याकरिता त्यांना सुरत येथील बीएपीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याने आयसीयू मध्ये आणलं. हाय फ्लो नेजल क्यानुला (नाकाद्वारे वेगात ऑक्सिजन देणारी नळी) द्वारे ऑक्सिजनही दिला जात होता. मात्र 9 ऑगस्ट रोजी ते उपचार घेत असताना 71 वर्षांचा माणूस अत्यवस्थ अवस्थेत असताना आयसीयूमध्ये आला आणि त्यांच्या उपचाराचा भाग म्हणून त्यांना व्हेंटिलेटर ट्यूब टाकावी लागते आणि ते काम कुशल तज्ञ डॉक्टर करत असतात. मात्र, त्यावेळी डॉक्टर येण्यासाठी काही काळ जाणार होता. मात्र, तो वेळ निघून जाऊ नये आणि तात्काळ वेळेत या रुग्णाला उपचार मिळावे म्हणून बाजूच्याच बेडवर उपचार घेत असणारे डॉक्टर मेहता उठले त्यांनी स्वतःच्या ऑक्सिजनची नळी बाजूला काढली आणि त्या रुग्णाला ट्यूब टाकून व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि स्वतः परत आपल्या बेडवर जाऊन उपचार घेऊ लागले. या प्रसंगावधानाने केलेल्या तातडीच्या उपचारानंतरही तो रुग्ण चार -पाच दिवस उपचार घेतल्यानंतर दगावला. डॉ. मेहता यांच्या या कामाची दखल सर्व माध्यमांमध्ये घेण्यात आली होती आणि सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते.
डॉक्टरांचे 'डॉक्टर' ला वाचविण्यासाठी क्राऊडफंडिंग
काही काळ रुग्णालयात घालवल्यानंतर डॉ. मेहता यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मागील 22 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्या काळात त्यांना एकमो (एक्सट्राकॉर्पोरल मेम्बरांस ऑक्सिजनेशन ) लावण्यात आले होते, त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता मंदावल्याने त्यांना हे मशीन लावण्यात आले होते, जेणेकरून त्यांचा श्वासोच्छवास आणि शरीरातील रक्त वाहिन्यांना थेट ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल. मात्र, एक वेळ अशी आली की तेथील डॉक्टरांनी सल्लामसलत करून त्यांचे अहवाल विविध तज्ञ डॉक्टरांनी पहिले आणि त्यांना आता फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची गरज असल्याचे निश्चित केले होते. त्यानंतर त्यांना चेन्नई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी डॉ. मेहता यांचे मित्र डॉ. जयेश ठक्कर, ते स्वतः अॅनेस्थेसिस्ट असून ते सुरत अॅनेस्थेसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगितले की, "सगळ्यांच्या सहकार्याने डॉक्टर मेहता यांची तब्बेत सुधारत आहे. शनिवारी ते चेन्नई वरून डिस्चार्ज घेऊन परत येणार आहे. त्यांना प्रत्यारोपणाची गरज लागली नाही ही खूप मोठी जमेची बाजू आहे. अजूनही त्यांना चालण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा अवधी लागणार असून सध्या ते वॉकरचा आधार घेऊन चालत आहे. त्यांच्यावर सध्या फिजिओथेरपीचे उपचार सुरु त्यासोबत स्पीचथेरपी सुरु आहे. डॉ. मेहता यांना त्यांचे दैनंदिन आयुष्य सुरु करण्यासाठी किमान अजून दोन महिने लागतील. कोरोनाबाधित झाल्यापासून ते शनिवारपर्यंतचा कालावधी 96 दिवसाचा आहे. चेन्नईच्या डॉक्टरांनी डॉ. मेहता यांच्यावर चांगले उपचार केले आहेत. फक्त चेन्नई येथील डॉक्टरांचे बिल आतापर्यंत जवळपास 60 लाख रुपये इतके झाले आहे. जेव्हा ते सुरत येथे होते त्यावेळी त्यांचे बीएपीएस रुग्णालयातील मोठे बिल रुग्णालयाने माफ केले आहे. त्याशिवाय त्यांच्यावर त्यांना सुरत येथे आल्यावरही मोठा खर्च येणार आहे."