Pandharpur News : वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, पंढरपूरमधील पुराचा धोका टळला, मात्र, व्यास नारायण झोपडपट्टीत शिरणार पाणी
उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं पंढरपूर (Pandharpur) शहरात पूर येण्याची शक्यता होती. मात्र, वीर धरणातून सुरु असणारा पाण्याचा विसर्ग कमी आल्यानं पुराचा धोका कमी झाला.
Pandharpur News : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, उजनी धरण (Ujani Dam) आणि वीर धरणातून (Veer Dam) मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं पंढरपूर (Pandharpur) शहरात पूर येण्याची शक्यता होती. मात्र, वीर धरणातून सुरु असणारा पाण्याचा विसर्ग आज कमी करण्यात आला असल्यानं शहरातील पुराचा धोका कमी झाला आहे. तर उजनी धरणातून भीमा नदीत 91 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु आहेत. मात्र काल सोडलेला 1 लाख 35 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी चंद्रभागा नदीत पोहोचणार आहे. त्यामुळं शहरातील नदी काठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरणार आहे.
नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्याची व्यवस्था
सध्या चंद्रभागा नदीतून 66 हजार क्यूसेकने पाणी वाहत आहे. आज दिवसभर ही पाणी पातळी वाहत जाणार असल्याने प्रशासनाने या ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करण्याची व्यवस्था केली आहे. काल सोडलेला 1 लाख 35 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी चंद्रभागा नदीत पोहोचणार आहे. त्यामुळं शहरातील नदी काठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरणार आहे. त्यामुळं प्रशासन सतर्क झालं आहे. मात्र, पंढरपूर शहारावरील पुराचा धोका थोडा कमी झाला आहे. कारण, वीर धरणाचा विसर्ग आज सकाळी सहा वाजता 45 हजारावरुन 15 हजार क्युसेक केल्यानं पुराचा धोका कमी झाला आहे.
भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या उजव्या तीरावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे आहे. एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो. सध्या प्रशासनाने कोळी बांधवांच्या होड्या सज्ज ठेवल्या असून आपत्कालीन यंत्रणा देखील कामाला लागली आहे. पंढरपुरमधील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत. सध्या धरणात येणारा पाण्याचा विसर्ग पाहता नदीतील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: