(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Barsu Refinery: रिफायनरीच्या वादात आता नारायण राणे फ्रंटफूटवर; 6 मे रोजी बारसूमध्ये जाणार
Narayan Rane: बारसू-सोलगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे भेट देणार आहेत. रिफायनरीच्या समर्थनासाठी तिथे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Narayan Rane: रत्नागिरीत होणाऱ्या बारसू रिफायनरीचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहेत. रत्नागिरीतील बारसू रिफायनरीवरुन राज्याचं वातावरण तापलं आहे. प्रस्तावित जागेवरील माती सर्वेक्षणाविरोधात गावकऱ्यांची आंदोलनंदेखील सुरु आहेत. यावर अनेक राजकिय नेत्यांनी आपल्या भूमिका देखील मांडल्या आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ बारसूला भेट देत असल्याची माहिती आज मंगळवेढा येथे दिली. 'मंगळवेढा महोत्सवा'साठी राणे आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.
6 मे रोजी आपणही बारसू येथे प्रकल्पाच्या समर्थनासाठी जाणार असून दीड लाख कोटींचा या प्रकल्पामुळे कोकणातील हजारो तरुणांना रोजगार मिळेल असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 6 मे रोजी बारसूमध्ये प्रकल्पाच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, निलेश राणे आणि अन्य काही मंडळी एकत्र येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. त्यासाठी प्रशासनाने मैदान उपलब्ध करुन देण्याची विनंती नारायण राणे यांनी केली आहे. 'आम्हांला पोटापाण्यासाठी नुसता विरोध करायचा नाही आहे, आम्हाला तिथे विकास हवा आहे.' असं नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले. सहा तारखेला परवानगी मिळाली की वेळ कळवणार असल्यांच राणेंनी सांगितलं आहे.
'राजीनाम्यानंतर रडणारी काही मंडळी भाजपाच्या दारात होती'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकिय वर्तुळात बऱ्याच प्रतिक्रिया उमटत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतयं. कार्यकर्त्यांकडून होणारा विरोध, व्यक्त केली जाणारी नाराजी या सगळ्या गोष्टींमुळे राजकारणात बरीच खळबळ माजली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर रडणारी काही मंडळी काही दिवसांपूर्वी भाजप प्रवेशासाठी भाजपाच्या दारात होते', असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे बोलताना केला. 'राजीनाम्यानंतर त्यांचे रडणं हे ढोंग होते असे आपण म्हणणार नाही' असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.
आजच्या मंगळवेढा येथील कार्यक्रमाकडे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप सेनेच्या आमदारांनी पाठ फिरविल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या शिवाय कोणत्याही भाजप नेत्याने कार्यक्रमास हजेरी न लावल्याने हाच चर्चेचा विषय होता .