Solapur News : पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं...; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, सोलापूरवर शोककळा!
Solapur News : अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाने सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Solapur News : मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Solapur Rain) नदी, नाले, ओढे, तलाव तुडुंब वाहत आहेत. या वाहत असलेल्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गावांना वेढा घातला आहे. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच आता बार्शी (Barshi) तालुक्यातील दहिटणे आणि कारी या दोन गावांमध्ये एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही आत्महत्या 24 सप्टेंबर रोजी घडल्या असून, या घटनांनी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान आणि कर्जफेडीची असह्य विवंचना या आत्महत्यांमागचं प्रमुख कारण असल्याचं कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दहिटणेतील लक्ष्मण गवसाने यांची आत्महत्या (Solapur News Laxman Gavsane)
बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील लक्ष्मण काशिनाथ गवसाने (वय 58) हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे फक्त दीड एकर कोरडवाहू शेती होती. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय गवसाने हे काही दिवसांपासून शारीरिक आजाराने त्रस्त होते. मानसिक तणावाखाली ते अधिकच गप्प राहू लागले होते. 23 सप्टेंबर रोजी दुपारी “बाजारात जाऊन येतो” असं सांगून ते घरातून बाहेर गेले, पण परतलेच नाहीत. 24 सप्टेंबर रोजी सकाळी, गावातील शेतात त्यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने गवसाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
कारी गावात शरद गंभीर यांची आत्महत्या (Solapur News Sharad Gambhir)
दुसरी घटना कारी गावात घडली असून, शेतकरी शरद भागवत गंभीर (वय 45) यांनी आत्महत्या केली आहे. गंभीर यांची साडेतीन एकर शेती असून त्यात त्यांनी पेरू व लिंबूचे बागायती पीक घेतले होते. मात्र, सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून संपूर्ण बाग नष्ट झाली. त्यांनी बँकेकडून सुमारे 7 लाखांचे कर्ज घेतले होते, तसेच गावातील लोकांकडून हातउसने आणखी 3 लाख रुपये उधार घेतले होते. एकूण 10 लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना, उत्पन्नाची कोणतीही शक्यता उरली नव्हती. कर्ज फेडण्याची चिंता आणि सततचा मानसिक तणाव यामुळे शरद गंभीर यांनी गायीला बांधलेल्या दावणाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
पोलीस तपास सुरू (Solapur News)
या दोन्ही घटनांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनांमुळे स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा
























