Solapur News: नीरा देवधर साठी 100 कोटींचा निधी मंजूर, माढा लोकसभेसाठी खासदार रणजित निंबाळकर यांचा मास्टरस्ट्रोक
येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपने थेट केंद्रीय जलाशक्ती मंत्री गजेंद्रसिंह याना आणून केंद्राकडून निधी आणण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर: कायम दुष्काळी असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर, खंडाळा, फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 43050 हेक्टर क्षेत्राला फायदा होणाऱ्या नीरा देवघर योजनेला 100 कोटी रुपये मंजूर झाल्याने भाजप खासदार रणजित निंबाळकर यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. मूळचा राष्ट्रवादीचा असणारा माढा लोकसभा मतदारसंघ 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपने मोठ्या मताधिक्याने जिंकत राष्ट्रवादीला हादरा दिला होता . आता येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपने थेट केंद्रीय जलाशक्ती मंत्री गजेंद्रसिंह याना आणून केंद्राकडून निधी आणण्याचा प्रयत्न केला.
चालू वर्षी 100 कोटी रुपये निधी मंजूर
यातूनच आता नीरा देवघर डावा कालवा 66 किलोमीटर ते 158 किलोमीटर आणि उजवा कालवा 11 किलोमीटर ते 65 किलोमीटर मध्ये अस्तरीकरण तसेच गावडेवाडी, शेख मिरवाडी आणि वाघोशी येथे उपसा सिंचन योजनेचा समावेश या कामात करण्यात आला आहे. यासाठी चालू वर्षी 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून 319 कोटीच्या स्थापत्य प्रापण सूचींस शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये नीरा उजवा 77 ते 131 किलोमीटर मधील बंदिस्त मालिकेद्वारे मुख्य कालवा आणि त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम करण्याचा समावेश आहे .
माढा मतदारसंघातील जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी
नीरा देवघर प्रकल्पांतर्गत फलटण तालुक्यातील उजवा कालवा 77 ते 131 किलोमीटर इतकी लांबी येते . हा भाग कायम दुष्काळी असल्याने फलटण तालुक्यातील किमान 10 किलोमीटर लांबीचे काम हाती घेण्याचा आग्रह खा निंबाळकर यांनी लावून धरला होता. यासाठी केंद्रीय निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविला होता.यास मान्यता मिळाल्यानंतर नीरा देवघर प्रकल्पाचा समावेश PMKSY होणार आहे. सध्या या कामाच्या निविदा चे काम सुरु झाल्याने कायम दुष्काळी असणाऱ्या माढा मतदारसंघातील जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत . पहिल्या टप्प्यात उजवा कालवा 77 ते 87 किलोमीटर या कामाच्या निविदा प्रक्रियेची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत.
येत्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा रणजित निंबाळकर
रणजित निंबाळकर यांनी सध्या माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी टोकाचे प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या निवडणुकीत केलेल्या कामावर जिंकणार असा त्यांचा दावा आहे. लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांसाठीही प्रतिष्ठेची असणार असून राष्ट्रवादी आपला पारंपरिक माढा मतदारसंघ पुन्हा मिळविण्यासाठी तयारी करत असून भाजपकडून माढा पुन्हा जिंकण्याची तयारी सुरु झाली आहे.यातूनच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आता राज्य सरकार सोबत केंद्रातूनही निधी आणण्यासाठी खा. निंबाळकर कामाला लागले आहेत. येत्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा रणजित निंबाळकर हेच उमेदवार असल्याचे संकेत मिळत असताना त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी फलटण येथील संजीवबाबा निंबाळकर याना उतरवण्याची तयारी करत आहे.