(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil : 'ज्यांना कार्यक्रमाचा आंनद घ्यायचाय त्यांनीच या', नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमातील हुल्लडबाजीनंतर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया
Gautami Patil : अहमदनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लबाडी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गौतमी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Gautami Patil : अहमदनगरमध्ये कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर गौतमी पाटील (Gautami Patil) हिने प्रतिक्रिया दिली आहे. तर 'ज्यांना माझ्या कार्यक्रमात गोंधळ घालयाचा आहे त्यांनी माझ्या कार्यक्रमात येऊ नका' असं म्हणत गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलतांना गौतमीने म्हटलं की, 'जितक्या संख्येने पुरुष कार्यक्रमाला येतात तितक्याच संख्येने महिला वर्ग देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात' असं देखील तिने म्हटलं आहे.
नगरच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लडबाजी
अहमदनगरमधील नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हुल्लडबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही तरुणांनी कार्यक्रमावेळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमादरम्यान दगडफेक करण्यास सुरुवात केली. तर या दरडफेकीमध्ये एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
हा गोंधळ झाल्यामुळे गौतमीचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पडला. तसेच यापुढे जर आयोजन व्यवस्थित केले नाही तर कार्यक्रम करणार नाही असा इशारा गौतमीने आयोजकांना दिला आहे. विशेष म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमावेळी पोलीस उपस्थित असताना देखील हुल्लडबाजांनी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.
अहमदनगरमधील या कार्यक्रमानंतर सोलापुरात गौतमीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नसल्याचं गौतमीने म्हटलं आहे. सोलापुरातील मंद्रूप येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तर या कार्यक्रमावेळी देखील काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी या कार्यक्रमादरम्यान कडक बंदोबस्त लावला.
'जर मला राज्याबाहेरुन किंवा देशाबाहेरुन कार्यक्रम करण्याची संधी आली तर मी नक्की करेन' अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली आहे. पण सध्या याबाबत कोणताही विचार नसल्याचं देखील गौतमीनं म्हटलं आहे. तर ज्यांना दगडफेक करायची आहे त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येऊ नका असं मी माझ्या चाहत्यांना सांगितलं असल्याचं गौतमीनं म्हटलं आहे.
चाहत्यांचे मानले आभार
तर काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर 1 मिलीयन फॉलोअर्स झाले असल्याचं गौतमीनं सांगितलं. तसेच प्रेक्षकांनी भरभरुन दिलेल्या प्रेमाबद्दल गौतमीने आभार देखील मानले आहेत. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा हुल्लडबाजांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमावर अनेकदा टीका टिप्पणी होत असल्याचं पाहायला मिळतं.