Solapur Earthquake News : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 4.6 रिश्टर स्केल इतकी तीव्रता
Solapur Earthquake News : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी आहे.
Solapur Earthquake News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य (Earthquake) धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 6.22 वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर एबीपी माझानं सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनानं या बातमीला दुजोरा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी साडे सहाच्या सुमारास हे भुकंपाचे धक्के जाणवल्याच्या माहिती नागरिकांनी दिली. सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला, पंढरपुरातील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. या माहितीस आता प्रशासनाने देखील दुजोरा दिला आहे.
कर्नाटकातील विजयापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र असून सकाळी 6.22 मिनीटांनी धक्के बसले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनानं दिली आहे. भूकंपाची तीव्रता 4.6 रेक्टर स्केल असून 10 किमी इतकी डेप्थ असल्याची माहीती देखील प्रशासनाने दिलीय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत देखील याचे परिणाम जाणवले आहेत. मात्र भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यानं कोणतीही हानी यामध्ये झाली नसल्याचे स्पष्टीकरण देखील प्रशासनानं दिलं आहे.
कर्नाटकात मागील काही दिवसांपासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, 23 जून रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी 3.4 रेक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा तालुक्यातील मालुगनहल्ली गावाजवळ भूकंपाचा केंद्र होता. या भुकंपाचे धक्के 40 ते 50 किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले होते, अशी माहिती देखील त्यावेळी देण्यात आली होती.
2 जुलै रोजी देखील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्याच्या काही भागात भुकंपाचे धक्के जाणवले होते. सुलिया तालुक्यातील दोड्डीकुमारीपासून 1.3 किलोमीटर पश्चिमेला भुकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता ही 1.8 रेक्टर स्केल इतकी होती. काही दिवसांपूर्वी विजयापुर येथील स्थानिक नागरिकांना देखील धक्के जाणवले होते. त्यावेळी प्रशासनाने भूकंपाचे धक्के नसून पावसामुळे भूगर्भीय हालचाली असल्याचे सांगितले होते. मात्र आज जाणवलेले धक्के हे भूकंपाचे असून विजयापूर पासून १० किलोमीटर अंतरावर भूकंप केंद्र असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशानाने दिली आहे.
भूकंप म्हणजे काय?
पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर हे भूकंपाचे मुख्य कारण आहे. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एखाद्या ठिकाणी आदळतात तेव्हा तिथं एक फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे वळले जातात. पृष्ठभागाचे कोपरे वळल्यामुळे तिथं दबाव निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतल्या उर्जेला बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, त्यामुळे पृथ्वी हादरते आणि आपण त्याला भूकंप समजतो.
भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?
भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.