Horse Market : देशातील पहिला घोडेबाजार भरण्यापूर्वीच 1 कोटींची विक्री; अकलूजच्या बाजारात 50 लाखांच्या कोब्राची चर्चा
Solapur News : यंदा या घोडेबाजारात काळाकुळकुळीत धिप्पाड कोब्रा या अश्वाचा बोलबाला असून त्याला सुरुवातीलाच 50 लाखाची बोली लागली आहे.
अकलूज : नखरेल अश्वांचे अनोखे नखरे आणि ऐट पुन्हा अकलूजच्या (Akaluj) घोडेबाजारात पाहायला मिळू लागली आहे. घोडेबाजाराच्या उद्घाटनापूर्वीच एक कोटी रुपयांच्या अश्वांची विक्री (Horse Selling) झाल्याने यंदाचा घोडेबाजार विक्रमी भरणार अशी चिन्हे आहेत. यंदा या घोडेबाजारात काळाकुळकुळीत धिप्पाड कोब्रा (Cobra) या अश्वाचा बोलबाला असून त्याला सुरुवातीलाच 50 लाखाची बोली लागली आहे.
दिवाळी पाडव्यादिवशी दरवर्षी या अकलूजच्या घोडेबाजाराचा शुभारंभ होत असतो. मात्र यंदा आधीपासूनच देशभरातून दर्जेदार घोडे दाखल झाल्याने उद्घाटनापूर्वीच एक कोटी रुपयांच्या घोड्यांची विक्री झाली आहे. यावर्षीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यंदा दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात खरेदीदार आले असून ठिकठिकाणी हे लुंगीवाले घोड्यांची पारख करताना दिसत आहेत.
घोडेबाजारात कोब्राचीच चर्चा
घोडेबाजार हे पहिल्यापासून सर्वांचेच आकर्षणाचे केंद्र राहिल्याने घोडेबाजारात हौशी लोकांची गर्दी असतेच पण घोडे शौकीन आणि खरेदीदारांसाठी देखील ही पर्वणी असते. यंदा बाजारात पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून तब्बल 1100 दर्जेदार अश्व उद्घाटनापूर्वीच दाखल झाले आहेत. यावर्षी बरेली येथून आलेला कोब्रा हा साडेतीन वर्षाचा अश्व सध्या सर्वांचा चर्चेचा विषय ठरला आहे. मारवाड जातीचा तेलिया कुंमेत प्रकारच्या या अश्वाची उंची 63 इंच इतकी असून याला धरायला दोन अश्व रक्षक लागतात इतका हा ताकतवान अश्व आहे. अतिशय देखणा असणाऱ्या या 'कोब्रा'ला चांगले प्रशिक्षणही दिले गेले आहे. त्याची ऐटबाज चाल आणि देखणेपणावर अश्व शौकीन फिदा होताना दिसत आहेत.
तर याच जोडीच्या प्रिन्स या पंजाबी अश्वाला 30 लाख रुपयाला मागणी झाली आहे. रंगाने पांढराशुभ्र , चमकदार डोळे, रुंद पाठ आणि ऐटबाज देखण्या प्रिन्स याचाही मोठा रुबाब आहे. हलग्याचा कडकडाट सुरु होताच पायात घुंगरू बांधून नाचणारा प्रिन्स मधूनच दोन पाय उंच करून दोन पायावर नाचत पुढे येत असतो. यंदा त्यामुळेच अकलूज बाजारात असणारे दर्जेदार अश्व खरेदीसाठी तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून मोठ्या संख्येने अश्व शौकीन अकलूज मध्ये दाखल झाले आहेत.
देशातील मुख्य घोडेबाजार...
कार्तिक यात्रेनंतर अकलूज मधील भरणारा घोडेबाजार हा आता देशातील मुख्य घोडेबाजारात गणला जाऊ लागला आहे . अकलूज बाजारात उंची किमतीचे दर्जेदार घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने खास अकलूज बाजारासाठी अनेक व्यापारी ठेवणीतले घोडे विक्रीस आणत असतात. या बाजारात 50 हजारापासून 50 लाखापर्यंत घोड्यांच्या किमती असून यात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. यात 6 महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या दर्जेदार घोड्यांच्या पिल्लांची किंमत सध्या जास्त असली तरी त्यांनाच मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
अशी ठरते अश्वाची किंमत...
घोड्यांच्या अंगातील जन्मजात असलेले रूप, स्वभाव, शुभ गुण आणि खुणा यावर घोड्यांच्या किमती असल्या तरी त्याची चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा याचीही पाहणी खरेदीदार करून त्याची किंमत ठरावीत असतात. घोड्यांचे नखरे हे त्याच्या सौंदर्याचे प्रतीक असते आणि या बाजारात अशाच अनेक घोड्यांचे नखरे अश्व शौकिनांना आकर्षित करत असतात. घोड्याची ऐटबाज चाल आणि धावण्याची पद्धत याचीही प्रात्यक्षिके खरेदीदारांच्या समोर केली जात असून त्यानंतर घोड्यांची विक्री होत आहे.
अकलूज घोडेबाजार यंदा विक्रमी होण्याची शक्यता असून यंदा किमान 15 कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा बाजार समिती कडून व्यक्त होत आहे.