विठ्ठल एकट्या हिंदू धर्माचा नाही, स्वामी कोर्टात गेले तर आम्हीही लढा देऊ - डॉ भारत पाटणकर
Pandharpur: विठ्ठल एकट्या हिंदू धर्माचा नाही , स्वामी कोर्टात गेले तर आम्ही देखील कोर्टात आणि रस्त्यावर लढाई लढू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर यांनी दिला आहे.
Shri Vitthal Rukmini Mandir, Pandharpur: विठ्ठल रखुमाई मुक्तिदिन कार्यक्रमात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विठ्ठल एकट्या हिंदू धर्माचा नाही , स्वामी कोर्टात गेले तर आम्ही देखील कोर्टात आणि रस्त्यावर लढाई लढू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विठ्ठल रखुमाई हे फक्त हिंदू धर्मचं दैवत नाही. मंदिराला सरकारी ताब्यातून मुक्त करण्यासाठी कोणी कोर्टात गेल्यास आम्ही देखील कोर्टात आणि रस्त्यावरील लढाई लढू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर यांनी दिल्याने या वादाला नवीन तोंड फुटण्याची शक्यता आहे. आज विठ्ठल रुक्मिणी मुक्तीचा नववा मुक्तिदिन तुकाराम भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी डॉ भारत पाटणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वितथक रुक्मिणी मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यातून 17 जानेवारी 2014 रोजी पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आले आणि याचाच आनंद साजरा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल , संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने हा मुक्तिदिन साजरा केला जात असतो.
मात्र पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करून हिंदू संतांच्या ताब्यात देण्यासाठी जेष्ठ विधिज्ञ आणि भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात स्वामी यांच्या भूमिकेच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटणार हे स्पष्टच होते. त्यानुसार आज डॉ भारत पाटणकर यांनी विठ्ठल रखुमाई हे फक्त हिंदू धर्माचे नसून तुम्हाला जी मंदिरे घ्यायची आहेत ती हिंदू मंदिरे घ्या पण हे फक्त हिंदूंचे मंदिर नसल्याचे सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोणताही धर्म नव्हता तेव्हापासून पंढरपूरची वारी सुरु असल्याचे आश्चर्यकारक वक्तव्य डॉ पाटणकर यांनी केले असून याबाबत अनेक संशोधने झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जुन्या विठ्ठलाच्या कथा आहेत त्यात कोठेही हिंदू धर्माचा उल्लेख नसल्याचे सांगताना संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम आणि संत नामदेवांनी हे विठ्ठल हे बुद्ध असल्याचे सांगितल्याचे वक्तव्य पाटणकर यांनी केले आहे. त्यामुळे हे फक्त हिंदूंचे मंदिर नसून येथे धर्म , जाती , स्त्री पुरुष यांच्या समतेचा संबंध असल्याने आम्ही या लढत उतरल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून काढण्यासाठी कोणी न्यायालयात गेले तर आम्ही देखील त्याच्या विरोधात लढा उभारू आणि न्यायालयात देखील जाऊ असा इशारा पाटणकर यांनी दिला आहे. मात्र इतर धर्माच्या धार्मिक स्थळांना सरकार का ताब्यात घेत नाही? असं विचारलं असता आपण नंतर बोलू असे गोल गोल उत्तर देत त्यांनी बोलणे टाळले. कोणताही धर्म स्थापन होण्यापूर्वी वारी सुरु होती आणि विठ्ठल मंदिर हिंदूंचे आहे असा कुठेही उल्लेख नाही, या त्यांच्या दोन वादग्रस्त वक्तव्यावर पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.