Sharad Pawar on Ram Mandir : मूर्ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली, "मंदिर वही बनाएंगे" म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली; शरद पवारांचा हल्लाबोल सुरुच
Sharad Pawar : मंदिर वही बनाएंगे म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली आहे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम केला जात आहे तो पाहून हा केवळ विशिष्ट समाजाचा कार्यक्रम असल्याचे दाखवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
सोलापूर : राम मंदिराचा (Ram Mandir) प्रश्न खूप जुना असून हिंदू-मुस्लिम वाद होता, केंद्रात काँग्रसचे सरकार होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या नेमल्या होत्या. राम जन्मभूमी न्यास या कमिटीचा मी अध्यक्ष होतो, राम मंदिराच्या कुलूपाची चावी राजीव गांधी यांनी खोलली, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Ram Mandir) यांनी करून दिली आहे.
मूर्ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवण्यात आली
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी यांनी बोलताना भाजपला राम मंदिराच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, रामजन्मभूमी न्यास कमिटीचा अध्यक्ष असताना मशीद पाडली तिथं मंदिर बांधण्याची भूमिका मांडली.
ते पुढे म्हणाले की, राम मंदिराचा दोन वर्षांपूर्वी निकाल लागला. आज जी मूर्ती ठेवण्यात आली ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर वही बनाएंगे म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली असल्याची टीका पवार यांनी केली. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम केला जात आहे तो पाहून हा केवळ विशिष्ट समाजाचा कार्यक्रम असल्याचे दाखवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
राम मंदिरात जाऊन माझ्या भावना व्यक्त करेन
मी अयोध्येत राम मंदिरात जाऊन माझ्या भावना व्यक्त करेन, पण निवडणुकीच्या तोंडावर आता जाण्याची गरज नाही, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी ईडी, सीबीआयकडून सुरु असलेल्या धाडींवरूनही भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, पण चौकशा लावल्या जातात. त्यांचे मंत्री आज तुरुंगात आहेत. महाराष्ट्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून तुरुंगात टाकल्याचे ते म्हणाले. अयोध्येत 7 हजार कोटी खर्च केला जात आहे. एकाबाजूला दुष्काळाग्रस्तांना मदत दिली जात नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामाच्या नावाचा वापर केला जाईल. सध्याचे राज्यकर्ते देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात असून सत्तेचा गैरवापर करत आहेत, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या