प्रशासनाने राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊ नये, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' वक्तव्यावर रोहित पवारांचा संताप
Rohit Pawar : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद (Kumar Ashirwad) यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
Rohit Pawar : सरकारी यंत्रणेवरचा विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली असती असं वक्तव्य सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद (Kumar Ashirwad) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) विषयावरुन आमदार रोहीत पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद (Kumar Ashirwad) यांना अनेक प्रश्न केले आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण नाही तोवर काहीही ॲक्शन घेतली जाणार नाही, असं प्रशासनाला म्हणायचं आहे का ? असे सवाल रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहेत.
प्रशासनाने उगाचच राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊ नये
मारकडवाडी ईव्हीएम विषयासंदर्भातल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर आमदार रोहीत पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी यंत्रणेवरचा विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली असती असे वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत रोहित पवारांनी काही सवाल केले आहेत. हा महात्मा गांधींच्या विचारांचा देश आहे. प्रशासनाने उगाचच राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊन नव्याने वाद निर्माण न करण्याचे आवाहन यावेळी रोहित पवार यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षांचा आक्षेप
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान, सोलापूरमधील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी या गावातील लोकांनी निवडणुकीत झालेलं मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली आकडेवारी तपासण्यासाठी गावात फेरमतदान करण्याची योजना गावकऱ्यांनी आखली होती. मात्र, प्रशासनाने फेरमतदान करण्यापासून गावकऱ्यांना रोखलं. गावात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिलं. उमेदवार फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. परंतु, फेरमतदान प्रक्रिया राबवण्याचा अधिकार नाही. तो अधिकार केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच आहे. लोकांच्या मनात पोस्टल बॅलेटबद्दल संभ्रम असू शकतो. त्यासाठी त्याने अर्ज करावा असे ते म्हणाले होते.
नेमकं काय म्हणाले होते जिल्हाधिकारी कुमाप आशिर्वाद?
अनेकांनी हा निकालच फसवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन नागरिकांचा प्रशासन व्यवस्थेवरील विश्वास कमी होतोय असं वाटतं का? असा प्रश्न कुमार आशीर्वाद यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मला नाही वाटत की लोकांचा प्रशासन व्यवस्थेवरील विश्वास कमी होतोय. लोकांचा विश्वास कमी झाला असता तर भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती. लोकांचा विश्वास कमी झाला असता तर बांगलादेशमध्ये जे घडतंय तसंच इथे घडलं असतं. तिथल्या लोकांचा सरकारवर, प्रशासन व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, तिथे झालेल्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच विश्वास नाही असं म्हणत तिथली जनता रस्त्यावर उतरल्याचे जिल्ह्याधिकारी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिा देत संताप व्यक्त केलाय.