प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरण! सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत तुफान गोंधळ, एकाला मारहाण, नेमकं घडलं काय?
आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत तुफान गोंधळ झाला आहे.

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांना रविवारी (13 जुलै) अक्कलकोट (Akkalkot) येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली होती. अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारनिमित्त प्रवीण गायकवाड हे रविवारी पत्नीसह अक्कलकोटला आले होते, यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान, आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजीत केली होती. जिल्ह्याभरातून मराठा समन्वयक या बैठकीला आलेत. मात्र, या बैठकीत तुफान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची आज सोलापुरात बैठक आयोजीत केली होती. या बैठकीला मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते. यावेळी बैठक सुरु असतानाच अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एका कार्यकर्त्याने वक्तव्य केले. त्यानंतर अमोल राजे भोसले यांचे समर्थक कार्यकर्ते भडकले. तसेच विरोधात बोलणाऱ्याला मारहाण देखील केली आहे. या बैठकीत सर्वजण आपले विचार व्यक्त करत होते. त्यावेळी एका तरुणाने अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख अमोलराजे भोसले यांच्यावर टीका केली म्हणून एका तरुणाला मारहाण केली आहे. यामुळं बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ का उडाला?
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकनंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजीत केली होती. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूरहून आलेल्या अॅड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला होता. यावेळी अॅड. रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला होता. याच ऐकरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते. आक्रमक समर्थक अॅड. रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले. यावेळी फावडेला प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झालेय यानंतर अॅड. रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं. त्यानंतर जन्मजेयराजे भोसले आणि त्यांचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले आहेत. पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अनेकांनी तीव्र निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरात घरात पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खरा इतिहास सांगणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत आणि विकृती सांगणाऱ्यांना अभय दिला जातोय. तुम्ही जी विकृती तयार कराल ती ठेचण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज जो प्रकार घडला आहे त्याला योग्य तेच उत्तर आम्ही देणार असल्याची भूमिका मराठा सेवा संघाने मांडली आहे. विचाराचा लढा विचाराने देऊ. तुम्ही जर कायदा हातात घेणार असाल तर याला सुद्धा आम्ही आमच्या भाषेत उत्तर देणार असल्याचा इशारा मराठा सेवा संघाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
प्रवीणदादांना आमच्याबद्दल कोणीतरी गैरसमज करुन देतोय, जन्मेजयराजे भोसलेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्यांच्याबद्दल असा विचार शक्यच नाही























